पार्थ पवार यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:53 AM2024-01-25T10:53:26+5:302024-01-25T11:12:44+5:30
निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे: पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासोबतच शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे ही हजर आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपत्नीक गजा मारणेची भेट घेतली. त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात जन्मलेला तरुण आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारीकडे वळला. त्यानंतर आतापर्यंत त्याची गुन्हेगारी सुरूच आहे. पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला. त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली. तो ३ वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या असून आजवर या टोळीवर 23 होऊन अधिक गुन्हे दाखल आहेत. तर गजा मारणेवर सहा पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला २० कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
पार्थ पवारांनी अशा गुन्हेगाराची भेट घेणं यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याची पत्नी माजी नगरसेविका असून निवडणुकीच्या तोंडावर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.