कुख्यात गुंड गजा मारणेला २८ पर्यंत मोक्का कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 06:32 PM2022-10-17T18:32:48+5:302022-10-17T18:34:45+5:30
२० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मारणेसह दोघांना अटक केली होती...
पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह दोघांना मोक्का न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मारणेसह दोघांना अटक केली होती. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मारणेला रविवारी (दि. १६) साताऱ्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतले होते. कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि मयूर जगदीश जगदाळे (वय ३१, रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) अशी अटक गुंडांची नावे आहेत. गजा मारणेसह सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रेय घोलप (रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), हेमंत ऊर्फ बालाजी पाटील (रा. बुरली, पलूस, सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर, कोडोवली, सातारा), सराईत गुन्हेगार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर (५६, रा. कोल्हापूर), अजय बबन गोळे (२८), मयूर राजेंद्र निवंगुणे (२४, दोघेही रा. नऱ्हे) आणि प्रसाद बापू खंडाळे (२९, पद्मावती) यांना या गुन्ह्यात यापूर्वी अटक केली आहे. मोनिका अशोक पवार (रा. दापोडी) आणि इतर तीन ते चार साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
मारणे आणि जगदाळे यांनी सोमवारी (दि. १७) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेली वाहने कुठे ठेवली आहेत याचा तपास करण्यासाठी तसेच साक्षीदाराचा चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी दोघांना मोक्का कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने दोघांना मोक्का कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.