कुख्यात गुंड संदीप मोहोळ खून प्रकरणी तिघांना जन्मठेप; तब्बल १४ वर्षांनी लागला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 07:17 PM2021-07-22T19:17:40+5:302021-07-22T19:28:07+5:30

खटल्यातील गुन्हेगार गणेश मारणेसह १३ जणांची निर्दोष मुक्तता

Notorious goon Sandeep Mohol sentenced to life imprisonment for murder; The result came after 14 years | कुख्यात गुंड संदीप मोहोळ खून प्रकरणी तिघांना जन्मठेप; तब्बल १४ वर्षांनी लागला निकाल

कुख्यात गुंड संदीप मोहोळ खून प्रकरणी तिघांना जन्मठेप; तब्बल १४ वर्षांनी लागला निकाल

googlenewsNext
ठळक मुद्देसंदीप मोहोळ यांची बहिण साधना मोहोळ यांचे म्हणणे तब्बल १४ वर्षानंतरही न्याय मिळाला तरी तो अपूर्णच सर्व आराेपींना शिक्षा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ तिघांनाच झाली शिक्षा

पुणे : पौड फाटा येथे कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा निर्घृण खुन केल्याप्रकरणी मोका विशेष न्यायालयाने सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडे या तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील गुन्हेगार गणेश मारणे, राहुल तारुसह १३ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. मोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एन.सिरसीकर यांनी हा निकाल दिला आहे.

सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबुब शेख आणि संतोष रामचंद्र लांडे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या खटल्यात एकूण १८ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले होते. खटल्याच्या दरम्यान यातील पांडुरंग मोहोळ आणि दिनेश आवजी यांचा मृत्यु झाला होता. गणेश मारणे, संजय कानगुडे, समीर ऊर्फ सम्या शेख, सचिन मारणे, राहुल तारु, अनिल खिलारे, विजय कानगुडे, शरद विटकर, निलेश माझीरे, राहुल शेख अशी निर्दोष मुक्तता झालेल्याची नावे आहेत.

संदीप मोहोळ हा ४ ऑक्टोंबर २००६ रोजी कारमधून जात असताना पौड फाटा येथे सिग्नलला कार थांबली. तेव्हा पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी हातोड्याने कारच्या काचा फोडल्या व त्याच्यावर जवळून गोळ्या घालून निर्घुण खून केला. टोळी युद्धातून हा खुन झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण १८ जणांना अटक केली होती.तत्कालीन दोन जिल्हा सरकारी वकिलांनी काम पहिले होते. तर आरोपींकडून बारा वकिलांनी बाजू मांडली होती.

मारणे टोळीतील अनिल मारणे याचा २००५ मध्ये टोळी युद्धातून संदीप मोहोळच्या टोळीतील गुंडांनी खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी २००६ साली संदीप मोहोळ याचा पौड रोड परिसरात खून करण्यात आला होता, असे पोलीस तपासातून स्पष्ट झाले होते. 

१४ वर्षे ३ महिने १८ दिवसांनी लागला निकाल

या गुन्ह्यात १८ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले. सरकारी वकील उज्वला पवार यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. या खटल्यात ७६ साक्षीदार तपासण्यात आले. हा खटला निकालापर्यंत आला असताना यातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे याच्याविरुद्ध फक्त १२० ब आरोप लावण्यात आला आहे. त्याच्यावर ३०२ चा आरोप ठेवण्यात आला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच्यावरील आरोपात ३०२ कलमाचा समावेश करण्यात आला. त्याला अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान देण्यात आले. परंतु, ते फेटाळण्यात आला. त्यानंतर पुन्हा सर्व साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. दरम्यान, सर्व आरोपी साडेसात वर्षे कारागृहात होते. खटला लांबल्याने आरोपींना २०१४ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. असे ॲड. विपुल दुशिंग यांनी सांगितले.

२०१४ नंतर खटल्याचे काम कामकाज रेंगाळत गेले. तत्कालीन जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी गेल्या वर्षी अंतिम युक्तीवाद केला होता. त्यानंतर कोरोनामुळे खटल्याचे काम रेंगाळले होते. आरोपींच्या काही वकीलांचा युक्तीवाद झाल्यानंतर आज तब्बल १४ वर्षे ३ महिने आणि १८ दिवसांनी या खटल्याचा निकाल लागला.

न्यायालयीन कामासाठी आरोपींनी मागितली होती खंडणी 

मोहोळच्या खुनातील दोन आरोपींनी न्यायालयाच्या कामकाजासाठी एका दुकानदाराकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दुकानदाराला मारहाण करून पैसे न दिल्यास तुरुंगात राहून ‘तुझी गेम वाजवू’ अशी धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी अनिल वाघू खिलारे (वय ४६) व सागर वाघू खिलारे (४२, रा. शुक्रवार पेठ) यांना अटक केली होती.

अपूर्ण न्याय

आम्हाला सर्व आराेपींना शिक्षा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ तिघा जणांना शिक्षा झाली. तब्बल १४ वर्षानंतरही न्याय मिळाला तरी तो अपूर्ण आहे असे वाटते, असे संदीप मोहोळ यांची बहिण साधना मोहोळ यांनी सांगितले.

Web Title: Notorious goon Sandeep Mohol sentenced to life imprisonment for murder; The result came after 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.