कुख्यात गुटखा तस्कर अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; दीड लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:35 IST2025-04-05T12:35:22+5:302025-04-05T12:35:48+5:30
२०२२ मध्ये गुटखा पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल्यापासून निजामुद्दीन पसार होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले

कुख्यात गुटखा तस्कर अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; दीड लाखांचा गुटखा जप्त
पुणे : प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्या कुख्यात तस्कराला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला राजगड पोलिसांकडून वर्ग करून घेत १ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. निजामउद्दीन महेबूब शेख (४०, रा. लोहियानगर, सध्या रा. मयूरपंख सोसायटी, कोंढवा) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणात २०२२ मध्ये दाखल गुन्ह्यात दोघांना अटक केली होती. गुटखा पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल्यापासून निजामुद्दीन पसार होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
प्रतिबंधित गुटख्याच्या विक्री प्रकरणात खडक पोलिस ठाण्यात २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी समीर शेख आणि बालाजी कर्ली या दोघांना बेड्या ठोकून दीड लाखाचा गुटखा जप्त केला होता. चौकशीत आरोपींना निजामउद्दीन शेखने गुटख्याची विक्री केल्याचे उघडकीस आले. गुन्हा दाखल होताच, शेख पसार झाला होता. तेव्हापासून खडक पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजगड पोलिसांनी गुटखा तस्कर निजामउद्दीनला अटक केली होती. त्यांच्याकडील तपास पूर्ण होताच, खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडे तपास केला जात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांनी दिली.
आरोपीचा काळेपडळ पोलिसही घेणार ताबा...
आरोपी निजामउद्दीन शेख हा काळेपडळ ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहे. या गुन्ह्यात संपत राज, सुरेशकुमार भाटी, प्रकाश भाटी, भवर भाटी, संदीप ढाका, आशू गुप्ता ऊर्फ शिवप्रकाश गुप्ता, गुप्ता हे आरोपी आहेत. दरम्यान, शेखचा ताबा मिळविण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली आहे. खडक पोलिस आरोपीला ४ एप्रिलला न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयाकडे पुन्हा त्याची कोठडी मागितली जाणार आहे. आरोपीला कोठडी मिळाली नाही, तर काळेपडळ पोलिसांकडून आरोपीला गुन्ह्यात वर्ग करून घेतले जाणार आहे.