सिनेस्टाइलने केला बसचा पाठलाग, मोक्का कारवाईतील कुख्यात दरोडेखोर अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 02:37 PM2021-04-16T14:37:02+5:302021-04-16T14:37:46+5:30
भोरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
पुणे: भोर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून फरार झालेल्या मोक्का मधील कुख्यात दरोडेखोरास गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आहे. याप्रकरणी चंद्रकांत लोखंडे वय ३२ रा.सातारा याला अटक करण्यात आली आहे.
दरोडा,जबरी चोरी,घरपोडी,चोरी यासारखे १४ गंभीर गुन्हे असलेला आरोपी लोखंडे याने पुणे,सातारा,नवी मुंबई जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवली होती. राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्स सोनार दुकानावर आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोने चांदी लुटले. सदर गुन्हेगाराची वाढती दहशत तसेच गुन्ह्याचे प्रकार थांबवून त्यास त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार सदर गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत लोखंडे पुरंदरला येणार असल्याची माहिती मिळाली. त्याच क्षणी पथकाने त्यास ताब्यात घेऊन राजगड पोलीस स्टेशनकडे दिले होते. दरम्यान १७ फेब्रुवारी २०२१ रोजी भोर लॉकअप या ठिकाणी पोलीस कस्टडीत असताना लॉकअपचा गज कापून पहाटेच्या दरम्यान चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत हे पळून गेले.
सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने पळून गेलेल्या आरोपीस ताबडतोब अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकसो यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सदर आरोपीचा तपास करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेपुढे होते. १५ एप्रिलला पुन्हा गोपनीय खबऱ्यामार्फत लोखंडे मुंबईवरून कर्नाटक याठिकाणी ट्रॅव्हल्स मधून निघाल्याची माहिती मिळाली. पथक तातडीने रवाना झाले. त्यांनी मुंबई एक्सप्रेस ला सदर बसचा पाठलाग सुरू केला. चांदणी चौक पास करून सदर बस खेडशिवापुरच्या दिशेने पुढे निघाली. बसचा सिनेस्टईल पाठलाग करून खेडशिवापुर या ठिकाणी बस थांबवून ताबडतोब झडती घेतली. लोखंडे बस मध्ये आढळून आल्यावर त्याला ताब्यात घेऊन भोर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिणचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट आणि त्यांच्या पथकाने केली आहे