भोर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून फरार झालेल्या मोक्कामधील कुख्यात दरोडेखोरास सिनेस्टाईल पाठलाग करून केले जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:08 AM2021-04-17T04:08:53+5:302021-04-17T04:08:53+5:30
दरोडा, जबरी चोरी, घरफोडी,चोरी यांसारखे १४ गंभीर गुन्हे असलेला आरोपी चंद्रकांत लोखंडे (वय ३२, रा. ढवळ, ता. फलटण, जि. ...
दरोडा, जबरी चोरी, घरफोडी,चोरी यांसारखे १४ गंभीर गुन्हे असलेला आरोपी चंद्रकांत लोखंडे (वय ३२, रा. ढवळ, ता. फलटण, जि. सातारा) याने पुणे,सातारा,नवी मुंबई जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवली होती.राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्स सोनार दुकानावर आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोने चांदी लुटून नेली होती. सदर गुन्हेगाराची वाढती दहशत तसेच गुन्ह्याचे प्रकार थांबवून त्यास त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. गुन्ह्यांचा तपास करीत असताना आरोपी चंद्रकांत लोखंडे हा नीरा या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले व पुढील तपास करण्याकामी राजगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले होते.
दरम्यान, १७ फेब्रुवारी २०२१ रोजी भोर लॉकअप या ठिकाणी पोलीस कस्टडीत असताना लॉकअपचा गज कापून पहाटेच्या दरम्यान आरोपी चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत हे लॉकअपमधून पळून गेले.
पळून गेलेल्या आरोपीस ताबडतोब अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सदर आरोपीचा तपास करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेपुढे होते. काल १५ एप्रिल रोजी बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली, की चंद्रकांत लोखंडे हा मुंबईवरून कर्नाटक या ठिकाणी ट्रॅव्हल्समधून निघाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना झाले. पथकाने मुंबई एक्सप्रेस बसचा पाठलाग सुरू केला. चांदणी चौक पास करून सदर बस खेड शिवापूरच्या दिशेने पुढे निघाली. बसचा सिनेस्टाईल पाठलाग करून खेड शिवापूर या ठिकाणी बस आल्यावर बस ताब्यात घेऊन झडती घेतली असता चंद्रकांत लोखंडे बसमध्ये आढळून आला. त्याची झडती घेऊन त्यास ताब्यात घेतले .त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी भोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक, विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पुणे,धनंजय पाटील उपविभागीय अधिकारी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोसइ अमोल गोरे, पोसइ रामेश्वर धोंडगे, राजू मोमीन,अमोल शेडगे, मंगेश भगत ,बाळासाहेब खडके,अक्षय नवले,अक्षय जावळे यांनी केली आहे.