कुख्यात शरद मोहोळचा साथीदारानेच केला ‘गेम’! लग्नाचा वाढदिवशीच चार गोळ्या झाडत काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:13 PM2024-01-06T13:13:26+5:302024-01-06T13:14:04+5:30
ही घटना सुतारदरा येथील मोहोळ याच्या कार्यालयासमोरच घडली. पोलिस आरोपींचा शोध घेत असून, लगेच ठिकठिकाणी नाकाबंदीदेखील करण्यात आली होती.
पुणे : कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास बंदुकीतून चार गोळ्या झाडण्यात आल्या. मोहोळ याचा साथीदार साहील ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने अन्य साथीदारांच्या मदतीने गोळीबार केला. लगेच मोहोळ याला खासगी रुग्णालयात व त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
ही घटना सुतारदरा येथील मोहोळ याच्या कार्यालयासमोरच घडली. पोलिस आरोपींचा शोध घेत असून, लगेच ठिकठिकाणी नाकाबंदीदेखील करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ याच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यामुळे कोथरूड येथील त्याच्या स्वत:च्या कार्यालयात नातेवाइक आणि शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी होती.
शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी कार्यालयातून तो बाहेर पडत होता. इतक्यात गर्दीतून चारजण पुढे आले. त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर बंदुकीतून बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये त्याच्या खांद्याला व त्याखाली गोळ्या लागल्या.
बारा तासांच्या आत आरोपींना बेड्या
- गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येनंतर बारा तासांच्या आत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपींना पकडण्यात यश आले. गुन्हा घडल्यानंतर लगेच गुन्हे शाखेची नऊ तपास पथके पुणे शहर, ग्रामीण आणि सातारा, कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती.
- पोलिस तपासादरम्यान पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी-शिरवळ दरम्यान एका स्विफ्ट गाडीत आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या चारचाकीचा पाठलाग करून गुन्हे शाखेने साहील ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर या मुख्य आरोपीसह अन्य सात आरोपींना ताब्यात घेतले.
- यावेळी आरोपींकडे ३ पिस्टल, ३ मॅगझिन, ५ राउंड आढळून आले. यासह पोलिसांनी दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, आरोपींनी हा गुन्हा जमिनीच्या आणि पैशांच्या जुन्या वादातून केल्याचे पोलिसांना सांगितले.
पत्नीचा राजकीय पक्षात प्रवेश
कातिल सिद्दीकीच्या खुनानंतर मोहोळने त्याची प्रतिमा देशभक्त म्हणून निर्माण केली होती. त्याच्या पत्नीने नुकताच सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश केला होता.