अबब..! पुण्यातील मार्केट यार्डात १४०० ग्रॅमचे हनुमानफळ दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 09:04 PM2019-11-11T21:04:37+5:302019-11-11T21:05:28+5:30
हनुमानफळ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
पुणे : नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातून गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये रविवारी हनुमानफळांची आवक झाली. तब्बल १ किलो ४०० ग्रॅमचे एक हनुमानफळ पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
गेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट यार्डातील हनुमानफळाची आवक सुरु झाली आहे़ सुरुवातीच्या काळात ही आवक तुलनेने कमी होती. आता ही आवक वाढू लागली आहे. रविवारी ५० क्रेट इतकी हनुमानफळाची आवक झाली़ एका क्रेटमध्ये १५ ते १६ किलो इतकी हनुमानफळे असतात़ उच्च दर्जाच्या फळास ८० ते १०० रुपये, मध्यम दर्जाच्या फळास ५० ते ७० रुपये आणि दुय्यम दर्जाच्या मालास ४० रुपये प्रतिकिलोस दर मिळाला़ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन चांगले आहे़ चांगला पाऊस झाल्यामुळे मालाचा दर्जा चांगला आहे़ शहरासह उपनगरातील स्ट्रॉलविक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून या फळास मागणी होती़
याबाबत व्यापारी संतोष ओसवाल यांनी सांगितले की, हनुमान फळ हे रामफळ व सीताफळ यांच्या जातीचेच एक फळ आहे. हनुमान फळ हे सीताफळाप्रमाणेच असले तरी आकाराने ओबडधोबड असते. ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्याने खाता येतो. हनुमान फळात सीताफळापेक्षा खूप कमी बिया असतात. एका हनुमान फळाचे वजन १०० ग्रॅमपासून दीड किलोपर्यंत असते. एका झाडाला सुमारे ४० किलो वजनाची फळे लागतात. फळाचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी असा असतो असेही ओसवाल यांनी नमूद केले़
---
हनुमानफळापासून चांगले उत्पन्न
गेल्या तीन-चार वर्षांपासून आमच्या शेतात लागवड केलेले हनुमानफळ मार्केटयार्डात विक्रीस पाठवित आहे़ त्याला प्रतिकिलोस १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ आम्ही २ एकर क्षेत्रावर लागवड केली आहे़ गेल्यावर्षी अडीच लाख रुपयांचे उत्पादन मिळाले होते यंदा त्यामध्ये वाढ होवून पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे़़
- नंदू आण्णा गवळी, शेतकरी राशीन (कर्जत तालुका)