पुणेकर नरमले ; हेल्मेटबाबतीत हाेतीये जागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 07:07 PM2019-01-05T19:07:36+5:302019-01-05T19:08:54+5:30
हेल्मेटबाबत नागरिकांमध्ये आता जागृती हाेत असून हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.
पुणे : आशिया खंडातील सर्वाधिक दुचाकी असणाऱ्या पुणे शहरात हेल्मेट सक्तीचे प्रयाेग याआधी अनेकदा करण्यात आले. परंतु प्रत्येकवेळी पुणेकरांनी या सक्तीला कडाडून विराेध केला. नवीन आयुक्त येताच त्यांनी नवीन वर्षापासून शहरात हेल्मेट सक्ती करणार असल्याचे जाहीर केले. नेहमीप्रमाणे यंदाही या सक्तीला विराेध झाला खरा, परंतु पाेलिसांनी आपली कारवाई चालूच ठेवली. एकीकडे पाेलीसांनी कारवाई सुरु ठेवली असताना दुसरीकडे नागरिकांचे समुपदेशन सुद्धा केले. याचा सकारात्मक परिणाम सध्या पाहायला मिळत आहे. एक जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केल्यानंतर अवघ्या पाचच दिवसात नागरिकांमध्ये जागृती हाेत असताना दिसत असून हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे.
पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असली तरी हेल्मेटला नेहमीच विराेध हाेत आला आहे. शहरात दुचाकीचा वेग अधिक नसताे, तसेच जवळच्या अंतरावर जाण्यासाठी हेल्मेटची गरज नाही. अशी अनेक कारणे नेहमीच दिली जातात. त्यातच हेल्मेटमुळे मान दुखते, केस गळतात असेही सांगितले जाते. हेल्मेट सक्तीला विराेध करण्यासाठी हेल्मेट सक्ती विराेधी कृती समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. परंतु हेल्मेट न घातल्यामुळे प्राण जाणाऱ्यांचे प्रमाण शहरात अधिक असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती गरजेची असल्याचे सांगत हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी जाहीर केले. त्याप्रमाणे कारवाई देखील करण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेल्या अनेक नागरिकांचे समुपदेशन देखील पाेलिसांकडून करण्यात आले. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम आता नागरिकांवर हाेताना दिसत असून सध्या हेल्मेट घालणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
शहरातील हेल्मेट्सच्या दुकानात नागरिकांची आता गर्दी हाेत आहे. विविध प्रकारचे हेल्मेट बाजारात असल्याने नागरिकांना पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातही कमी वजनाचे हेल्मेट देखील बाजारात उपलब्ध असल्याने नागरिकांच्या ते साेयीचे हाेत आहे. सध्या शहरात प्रत्येक दाेन दुचाकी चालकांच्यामागे एकजण हेल्मेट घालत असल्याचे दिसत आहे.