आता गावागावांतही मिळणार ‘आधार’
By admin | Published: August 27, 2015 04:46 AM2015-08-27T04:46:53+5:302015-08-27T04:46:53+5:30
आधार कार्ड नोंदणीसाठी खेडेगावातील ग्रामस्थांचे हेलपाटे टाळण्यासाठी तसेच या मोहिमेला गती देण्यासाठी शासनाने संग्राम कक्षातील आॅपरेटरची मदत घेण्याचे ठरविले असून
पुणे : आधार कार्ड नोंदणीसाठी खेडेगावातील ग्रामस्थांचे हेलपाटे टाळण्यासाठी तसेच या मोहिमेला गती देण्यासाठी शासनाने संग्राम कक्षातील आॅपरेटरची मदत घेण्याचे ठरविले असून, आता त्यांच्यामार्फत ग्रामपंचायतीतच आधार कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यासाठीचे दोन दिवसांचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेत झाले असून, लवकरच हे संग्राम आॅपरेटर आधार आॅपरेटर म्हणूनही काम पाहणार आहेत.
ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्यांतील विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी राज्यातील ग्रामपंचायतीतील संग्राम आॅपरेटरची मदत घेण्याच्या प्रस्तावाला सहमती मिळाली असून, त्यानुसार राज्यात नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, नागपूर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
याअंतर्गत संग्राम कक्षातील आॅपरेटरना प्रशिक्षण दिले जात असून, प्रशिक्षणानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत जे पास होतात, त्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांची या कामासाठी निवड करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील ३५० संग्राम आॅपरेटरना २५ व २६ आॅगस्ट असे दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. त्यांची २७ आॅगस्टला परीक्षा घेण्यात येईल.
हे प्रशिक्षित आॅपरेटर त्या-त्या ग्रामपंचायतीत सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठवडेबाजार, मोठ्या यात्रा, मोठे दवाखाने, प्रसूतिगृह (खासगी किंवा सरकारी) आदी ठिकाणी गरजेनुसार कॅम्प लावून आधार नोंदणी करणार आहेत. त्यांनी या नोंदणीसाठी
ग्रामस्थ किंवा विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारायचे नाही, अशा स्पष्ट सूचना असून, तसे केल्यास संगणक परिचालक किंवा ग्रामपंचायतींवर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)
आधारला मिळणार गती
जिल्ह्यात ९४ लाख २९ हजार ४०८ लोकसंख्या असून, ४७ लाख ५८ हजार २३५ नागरिकांनी आधार नोंदणी केली आहे. अजून ४६ लाख ७१ हजार १७३ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी केलेली नाही. जिल्ह्यातील प्रशिक्षण दिलेल्या ३५० आॅपरेटरपैैकी साधारण २०० आॅपरेटर ही परीक्षा पास होतील, असा अंदाज आहे. आता जिल्ह्यात १७० मशीन उपलब्ध आहेत. आणखी मशीन शासनातर्फे मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता आधार नोंदणीला गती येईल.
ग्रामस्थांना पूर्वकल्पना
ज्या गावात किंवा सार्वजनिक ठिकाणी हा आधारचा कॅम्प होणार आहे, तेथे गावात दवंडी किंवा इतर माध्यमातून पूर्वकल्पना देण्यात येईल. तसेच, ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही, त्यांना फॉर्म देऊन अगोदरच तो भरून घेतला जाणार आहे. हा कॅम्प सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्र्यंत ठेवून त्या गावातील सर्व नागरिकांना आधार कार्ड देण्याचा मानस आहे.