मूठमातीकडून आता अग्निसंस्कारांकडे...
By admin | Published: March 30, 2017 12:18 AM2017-03-30T00:18:51+5:302017-03-30T00:18:51+5:30
सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) येथे यापूर्वी भटके जीवन जगणाऱ्या; मात्र अनेक वर्षांपासून गुळुंचे गावात
नीरा : सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) येथे यापूर्वी भटके जीवन जगणाऱ्या; मात्र अनेक वर्षांपासून गुळुंचे गावात वास्तव्यास असणाऱ्या देऊळवाले समाजात कायमच्या भटकंतीमुळे मृत्यूनंतर मूठमाती देण्याची प्रथा होती. परंतु या समाजातील एका महिलेच्या निधनानंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला.
तुकाई टेकडीच्या खाली देऊळवाले समाजातील लोकांची वस्ती आहे. त्यांची पाच ते सहा घरे आहेत. येथील पूनम शंकर निंबाळकर (वय २५) या महिलेचे निधन झाले. हा समाज आजवर भटके जीवन जगत आला आहे. भटकंती दरम्यान एखाद्याचे निधन झाल्यास त्याच्या मृतदेहाला मूठमाती दिली जाई. आता मात्र स्थिर जीवन जगत असल्याने मृतदेहाला अग्निसंस्कार देणे अधिक योग्य आहे, असा निर्णय समाजातील ज्येष्ठांनी घेतला. मात्र गावात अग्नीसंस्कार करून देण्यास काहींचा विरोध होता. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी या कुटुंबांना धीर दिला व गावच्या सरपंच रत्नमाला जगताप यांचे पती व सांसद आदर्श ग्राम समित्यांचे समन्वयक सुरेश जगताप यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. जगताप यांनी देऊळवाले समाजातील नागरिकांच्या भूमिकेला पाठबळ दिले.
आजही गावाबाहेरच..
अनेक वर्षांपासून ही कुटुंबे गावाबाहेर उघड्यावर संसार थाटून आपली उपजीविका करत आहेत. शिधापत्रिका, मतदानकार्ड असूनही आजही या लोकांना गावाचे रहिवासी ठरविण्यात येत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.