आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी देऊ शकणार शाळांना सुट्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 08:15 PM2019-08-02T20:15:41+5:302019-08-02T20:18:02+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
पुणे : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, जनजीवन विस्कळीत होणे, नद्यांना पुर येणे, अतिवृष्टी यांमुळे विद्यार्थी, शिक्षकांना शाळेपर्यंत पोहचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवितासह धोका निर्माण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष असतात. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुट्टी जाहीर केलेल्या दिवशी शाळेमध्ये परीक्षा असल्यास परीक्षांचे पुनर्नियोजन करून पुनर्परिक्षा घेण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्यापकांना राहतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा सुरू असल्यास या परीक्षांचे पुर्ननियोजन करण्याचे अधिकार शिक्षण मंडळ व परिषदेकडे असतील, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.