काँग्रेसमधील वादांना आता जाहीर स्वरूप

By Admin | Published: July 5, 2017 03:26 AM2017-07-05T03:26:35+5:302017-07-05T03:26:35+5:30

महापालिकेतील दारुण पराभवानंतरही काँग्रेसच्या शहरातील नेते, पदाधिकाऱ्यांत शहाणपण आलेले दिसत नाही. अवघे ९ नगरसेवक

Now the declaration of controversy in Congress | काँग्रेसमधील वादांना आता जाहीर स्वरूप

काँग्रेसमधील वादांना आता जाहीर स्वरूप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेतील दारुण पराभवानंतरही काँग्रेसच्या शहरातील नेते, पदाधिकाऱ्यांत शहाणपण आलेले दिसत नाही. अवघे ९ नगरसेवक (१ स्वीकृत) असूनही त्यांच्यातसुद्धा एकवाक्यता दिसायला तयार नाही, तर शहर शाखेतील अनेक गटांनी आता उघडपणे आपले अस्तित्व दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. या सगळ्यामागे सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळवण्याची स्पर्धा असल्याचे दिसते आहे.
काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस दिग्विजयसिंह मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये आले होते. त्या वेळी ही बाब प्रकर्षाने उघड झाली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले  अभय छाजेड, सचिव असलेले  संजय बालगुडे, आमदार अनंत गाडगीळ व अन्य काही पदाधिकारी  या वेळी अनुपस्थित होते.  शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी
आमदार मोहन जोशी, नगरसेवक आबा बागुल, उल्हास पवार, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे आदींची उपस्थिती होती. या दोन गटांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्त स्पर्धाच सुरू आहे. त्यातून कार्यकर्त्यांची परवड होत असून, पक्षाचीही हानी होत आहे.
फक्त ९ नगरसेवक असताना आता महापालिकेतही उघडपणे दोन गट पडले आहे. त्यातील एका गटाचे अरविंद शिंदे तर दुसऱ्या गटाचे आबा बागुल नेतृत्व करीत आहे. २९ नगरसेवकांचा पक्ष ९ नगरसेवकांवर आणूनही शिंदे यांना गटनेतेपदाची बक्षिसी का दिली, असा बागुल गटाचा सवाल आहे तर पक्षासाठी आतापर्यंत काय केले ते सांगा, सगळी पदे मिळवून झाल्यानंतरही फक्त स्वत:साठीच काम होत असेल तर पक्षाने काय करायचे, असा प्रश्न शिंदे गटाकडून विचारला जात असतो. त्यातूनच शिंदे यांनी मध्यंतरी बागुल यांना महापालिकेतील अनुपस्थितीबद्दल नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना बागुल यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेच तक्रारी केल्या.
काँग्रेसच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची नेत्यांच्या या स्पर्धेत चांगलीच ससेहोलपट होत आहे. कोणाकडे जावे तर लगेचच त्याच्या नावाचा शिक्का पडतो व दुसऱ्या गटातून हकालपट्टी केली जाते. पक्षाचे काम समजून काँग्रेस भवनमध्ये जावे तर नेत्यांकडून आमच्याकडे या म्हणून ओढाताण केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादातच या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे नुकसान झाले असल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमदार गाडगीळ तसेच बालगुडे, छाजेड आदींनी
महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचा मुद्दा उचलून धरला.
काँग्रेसने या गावांचा समावेश करावा असा आग्रह धरला असतानाही या सर्वांनी ३४ गावांचा समावेश न करता तिथे स्वतंत्र महापालिका करावी, अशी भूमिका घेत त्यासाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर एक दिवसाचे उपोषण केले.
त्याला शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखवली. पक्षाशी विसंगत असलेल्या भूमिकेबरोबर कसे सहमत होणार, असे बागवे यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी जाहीरपणे या सगळ्याची बेशिस्त अशा संभावना केली.
आता बालगुडे यांच्या गोटात बागवे यांनी शह कसा द्यायचा याची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरता येईल याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Now the declaration of controversy in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.