आता धायरीकरांना मिळणार बंद नलिकेतून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:05+5:302021-05-22T04:12:05+5:30
कल्याणराव आवताडे धायरी : सिंहगड रस्त्यावरील धायरी गावाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तूट भरून काढण्यासाठी थेट कालव्यामधून पाणी घेण्यात ...
कल्याणराव आवताडे
धायरी : सिंहगड रस्त्यावरील धायरी गावाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तूट भरून काढण्यासाठी थेट कालव्यामधून पाणी घेण्यात येत होते. हेच पाणी नागरिक पिण्यासाठी म्हणून वापर करीत असल्याने 'कालव्याच्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात' अशा मथळ्याखाली दैनिक लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिकेच्या वतीने
धायरीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बंद नलिकेला १६ इंचीची दुसरी वाहिका जोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते गुरुवारी पूर्ण करण्यात आले असल्याचे नगरसेविका अश्विनी पोकळे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता धायरीकरांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे.
धायरी गावाला आत्तापर्यंत १६ इंची बंद वाहिकेतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने पाणीपुरवठा विस्कळीत होत होता, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पालिकेला भरमसाठ कर भरूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे उघड्या कॅनॉलमधून पाणीउपसा करण्यात येत होता आणि हेच पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत होते. यासाठी नागरिकांनी विरोध करत उघड्या कॅनॉलचे पाणी बंद करावे आणि बंद कॅनॉलमधून पाणीपुरवठा वाढवण्यात यावा, अशी मागणी धायरीगावच्या माजी सरपंच आशा बेनकर यांनी केली होती.
नगरसेविका अश्विनी पोकळे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून दहा दिवसांत नवीन १६ इंची पाईपलाईन करण्यात आल्याने आता धायरीकरांना १६ इंचाच्या दोन बंद वाहिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
यामुळे धायरी गाव, रायकरमळा, चव्हाणबाग वस्ती, जाधवनगर, महादेवनगर, डीएसके विश्व, बेनकरनगर, धायरी गावठाण, पोकळेवस्ती, अंबाई दरा, कामठेवस्ती आदी भागातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
----------------
कोट:
धायरी परिसराला वारंवार पाण्याची कमतरता भासत असल्याने आम्ही अजून एक १६ इंची बंद वाहिका जोडण्यात यावी, अशी मागणी महापालिकेकडे केली. यावर पाणीपुरवठा विभागाने तत्काळ मंजुरी दिल्याने काम पूर्ण करण्यात आले आहे.
- अश्विनी पोकळे, नगरसेविका
-----------
खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिकेला दुसरी १६ इंची वाहिका जोडण्यात आली आहे. त्यामुळे धायरी येथील बारांगणी मळा येथे असलेल्या विहिरीमध्ये मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.
- राजेश गुर्रम, उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग