आता डॉॅक्टर-रुग्णांमध्ये जुळणार ‘डिजिटल’ बंध - डॉ. राजीव चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 03:17 AM2018-03-18T03:17:48+5:302018-03-18T03:17:48+5:30

अनेकदा औषधे चिठ्ठी (प्रिस्क्रिपशन), संमती पत्र, डिस्चार्ज कार्ड यावर रुग्णांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली गेलेली नसते. त्यावरील अपुरी माहिती तसेच डॉक्टरांचे हस्ताक्षर समजत नसल्याने रुग्ण व नातेवाइकांचे डॉक्टरांमध्ये वादही होतात.

 Now 'digital' bonds will be matched by doctors and patients - Dr. Rajiv Chaudhary | आता डॉॅक्टर-रुग्णांमध्ये जुळणार ‘डिजिटल’ बंध - डॉ. राजीव चौधरी

आता डॉॅक्टर-रुग्णांमध्ये जुळणार ‘डिजिटल’ बंध - डॉ. राजीव चौधरी

Next

पुणे : अनेकदा औषधे चिठ्ठी (प्रिस्क्रिपशन), संमती पत्र, डिस्चार्ज कार्ड यावर रुग्णांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली गेलेली नसते. त्यावरील अपुरी माहिती तसेच डॉक्टरांचे हस्ताक्षर समजत नसल्याने रुग्ण व नातेवाइकांचे डॉक्टरांमध्ये वादही होतात. हे वाद टळून डॉक्टर-रुग्णांमध्ये सलोखा निर्माण व्हावा, या उद्देशाने पुण्यातील राही हेल्थ केअरचे ज्येष्ठ मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. राजीव चौधरी यांच्या संकल्पनेतून एक आगळेवेगळे सॉफ्टवेअर साकारण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमुळे रुग्णांशी संबंधित सर्व अत्यावश्यक माहिती डॉक्टर देऊ शकणार आहेत. रुग्णकेंद्रित पण डॉक्टरांना वापरावयाच्या या विनामूल्य सॉफ्टवेअरमुळे दोघांमधे डिजिटल बंध जुळणार आहेत.
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या वैद्यकीय यंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे डॉक्टर व रुग्णांमधील संबंध ताणले जातात. अनेकदा वाद विकोपाला गेल्याचे प्रकार घडतात. प्रामुख्याने हे वाद ज्या गोष्टींमुळे घडतात, त्यावर अभ्यास करून डॉ. चौधरी यांनी सॉफ्टवेअरची नावीण्यपूर्ण कल्पना आकाराला आणली आहे. गुढीपाडव्यादिवशी या सॉफ्टवेअरचे लोकार्पण होणार आहे. डॉ. चौधरी यांनी ‘लोकमत’शी संवाद साधत सॉफ्टवेअरविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे जातात, तेव्हा त्यांना आपला आजार, त्यावरील औषधे, उपचारांविषयी संपूर्ण माहिती मिळणे अपेक्षित असते. पण अनेकदा तसे होत नाही. औषधांच्या चिठ्ठीवर डॉक्टरांचे न समजणारे हस्ताक्षर रुग्णांसाठी डोकेदुखी ठरते. त्यावर पुरेशा सूचना व माहिती नसते. त्यातून काहीवेळा रुग्णांकडून चुकीची औषधे, डोस घेण्याचा धोका असतो. रुग्णालयातून रुग्णाला घरी सोडताना डिस्चार्ज कार्ड दिले जाते. यावर रुग्णांसाठी महत्त्वाची माहिती कुठेतरी कोपऱ्यात दिलेली असते. ही माहितीही अपुरी असते. एखाद्या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण किंवा नातेवाईकांकडून संमती पत्र घेतले जाते. मात्र, त्यावरही शस्त्रक्रिया किंवा उपचारपद्धतीबाबत पुरेशी माहिती नसते. अनेक वर्षांपासूनच हीच पद्धत सुरू आहे. पण त्यामुळे अडचणी निर्माण होतात. उपचारादरम्यान रुग्ण मृत्यू झाल्यास वाद होतात. वाद विकोपाला गेल्यामुळे रुग्णालयांमध्ये तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत.’

कसे आहे सॉफ्टवेअर...
डॉक्टरांना www.iagreedoctor.com या संकेतस्थळावरून सॉफ्टवेअरवर उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये डॉक्टरांना नोंदणी करून लगेचच काम सुरू करता येईल. हे सॉफ्टवेअर सर्वांसाठी आयुष्यभर मोफत असेल. अन्य काही कंपन्यांकडून सध्या उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सॉफ्टवेअरमुळे अनेक डॉक्टरांना त्रास होत आहे. त्यासाठी जास्तीचे पैसेही खर्च करावे लागतात. नवीन सॉफ्टवेअरवर एकदा नोंदणी केल्यानंतर डॉक्टर जगात कुठेही बसून चोवीस तास त्याचा वापर करू शकतात. डॉक्टरांना रुग्णांची माहिती ई-मेलही करता येऊ शकेल. त्यामुळे हे सॉफ्टवेअर दोघांसाठीही अत्यंत सोपे आणि फायदेशीर ठरेल, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.

रुग्णांना उपचारांची संपूर्ण माहिती मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्याचप्रमाणे ती डॉक्टरांचीही जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, त्यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. सॉफ्टवेअरमध्ये औषध चिठ्ठी, डिस्चार्ज कार्ड, संमतीपत्र, रुग्णालयांची शुल्क पावती यांचे सर्वसाधारण नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये रुग्णांना आवश्यक सर्व माहिती डॉक्टरांना नमूद करता येईल. औषधे, झालेले उपचार, शस्त्रक्रिया, त्यातील छोटे-मोठे धोके याची सविस्तर माहिती देता येणार आहे. त्यानुसार हे नमुने तयार करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या सोयीनुसार तयार करण्यात आलेले हे नमुने रुग्णकेंद्रित आहेत. हे सर्व नमुने इंग्रजीसह मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध असतील. त्यामुळे डॉक्टर व रुग्णांमधील वाद टाळता येणार आहेत. तसेच कायदेशीर बाबतीत डॉक्टरांसाठी हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. - डॉ. राजीव चौधरी

Web Title:  Now 'digital' bonds will be matched by doctors and patients - Dr. Rajiv Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.