आता भिंतीतून हाेणार वीजनिर्मिती ; इमारतीचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 12:18 PM2020-03-01T12:18:23+5:302020-03-01T12:23:08+5:30
काचेच्या भिंतीमधून वीज निर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून याचे सेंटर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आले आहे.
पुणे : जगभरात वाढत चाललेल्या विजेच्या मागणीमुळे येत्या काळात विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून विविध संशाेधन केले जात आहे. आत्तापर्यंत घरांच्या छतांवर साेलार पॅनल बसवून विजेची निर्मिती केली जात असे. आता काचेच्या इमारतीच्या सर्वबाजूंनी विजनिर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याचे पहिले प्रायाेगिक केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागात (स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज) हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या चारही भिंतींवर वैशिष्ट्यपूर्ण काचा बसवण्यात आल्या आहेत. या चार भिंतींद्वारे दररोज १४-१५ युनिट उर्जा निर्मिती होऊ लागली आहे. सोलर स्केप एन्टरप्रायझेस एल एल पी या कंपनीने चीनमधून हे तंत्रज्ञान आणले आहे. सुरवातीच्या काळात येथे या काचांची भिंत उभारण्यासाठी आवश्यक साहित्याची जुळणी आणि पुढील टप्प्यात उत्पादनही केले जाणार आहे. देशातील हा असा पहिलाच उपक्रम आहे.
सोलर स्केप या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश पिंपळखुटे म्हणाले, भारतामध्ये पहिल्यांदाच हे तंंत्रज्ञान आणण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान सर्वांना कळावे यासाठी इथे हे सेंटर उभारण्यात आले आहे. या इमारतीच्या सर्व बाजूंनी लावलेल्या काचा या उर्जा निर्माण करत आहेत. या काचा पारदर्शक आहेत. यापासून 14 ते 15 युनीट वीज दिवसाला निर्माण केली जात आहे. यानंतर देशभरात हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. नेहमीच्या साेलार पॅनलमध्ये पारदर्शकता नसते. यात इमारतीला लावण्यात आलेल्या पारदर्शक काचांच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाणार आहे.
विद्यापीठाच्या आवारात हे 'अनुभव केंद्र' उभारल्यामुळे उर्जा विभागाच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.