आता स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी करावी लागते प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 10:55 AM2021-04-08T10:55:34+5:302021-04-08T10:56:32+5:30
येरवड्यातील अमरधाम येथील चिंताजनक परिस्थिती
विशाल दरगुडे
कोरोनामुळे उपनगरात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. येरवड्यात अमरधाममध्ये विद्युतदाहीनीवर एकावेळी दोन अंत्यविधी व लाकडावर सात अंत्यविधी करू शकतात. परंतु याठिकाणी दररोज अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. साहजिकच येरवड्यातील अमरधाम स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
गेल्या दहा दिवसापासून वडगावशेरी, खराडी, चंदननगर, विमाननगर भागात कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. त्याप्रमाणे मृत्यूही मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने आता मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधी करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. सामान्यता कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी विद्युत किंवा गॅस, डिझेल शवदाहीनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचा आदेश आहे. त्यातच संसर्ग टाळण्यासाठी नातेवाईक आता मृत झालेल्याला रुग्णालयातून थेट अमरधाममध्ये नेत असल्याने या ठिकाणी वेटिंगला सामोरे जावे लागत आहे. मात्र गेल्या दहा दिवसापासून दररोज सरासरी पंधरा ते वीस अंत्यविधी होत असल्याने स्मशानभूमीवर मोठा ताण येत आहे. विद्युत दाहीनीमध्ये एक मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी किमान दोन तास लागतात. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातून या ठिकाणी येरवड्यात अत्यंसंस्कार करण्यासाठी येत आहेत.त्यामुळे येथेही ताण अधिक आहे. मुंढवा येथील स्मशानभुमीतही नातेवाईकांना मृतदेह अत्यंविधीसाठी वेटींगरच राहवे लागत आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांचा अंत्यविधी अमरधाममध्ये
पुणे शहरात दररोज चाळीस ते पन्नास रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यापैकी जवळपास निम्म्याहून अधिक रुग्णांचा अंत्यविधी हा येरवडा अमरधाम मध्ये विद्युत दाहिनी वर केला जात असल्याने या ठिकाणी अधिक ताण आहे.
अंत्यविधी करणारा कर्मचारी करतोय जीवावर उदार होऊन काम
येरवड्यातील अमरधाममध्ये अंत्यविधी करताना कर्मचाऱ्यांनी पीपीई किट,मास्क,सॉनिटायझर यासारख्या सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र अंत्यविधी करण्यासाठी येथील कर्मचारी केवळ मास्क लावून काम करत आहेत.