आता चिमुकल्यांची खेळणी झाली महाग; महागाईने हिरावला खेळण्याचाही आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 02:34 PM2022-07-08T14:34:07+5:302022-07-08T14:35:15+5:30
शंभर रुपयांची खेळणी तीनशे रुपयाला
पुणे : लहानपणी सर्वांनाच सगळ्यात जास्त आवडते ते खेळणे. आता चीनवरून येणाऱ्या खेळण्यांवर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कर लावल्याने खेळण्याचे दर जवळपास तिप्पट झाले आहेत. परिणामी खेळणे घेणेही पालकांना परवडत नाही. त्यामुळे चिमुकल्यांचा खेळण्याचा आनंद हिरावला जात आहे. दरवाढीचा फटका ग्राहकांबराेबरच फेरीवाल्यांना बसत आहे.
दरम्यान, चीनवरून येणारी खेळणी सुमारे ७० टक्क्यांनी कमी झाली. चीनमधून मशिनरीचे सुट्टे भाग आणून देशात चीनसारखी खेळणी तयार केली जात आहे. उत्पादन क्षमता कमी झाली आहे आणि खेळण्याची गुणवत्ताही दर्जेदार नसल्याने ग्राहकांची मागणी कमी झाली आहे. बॅट-बॉल, बाहुली, घोडा, कॅरम, चेस, घरगुती वस्तू, रिमोट कंट्रोलच्या मोटारी, आगगाड्यांपासून ते मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत गाडी, माेटारपासूनच्या वस्तूंना तीन पट भाव झाल्याने खेळणी घेणे पालकांच्या खिशाला परवडत नाही.
बाहुली, टेडी, तलवार, रिंग, प्लास्टिकचे बॉल, बॅट, रिमोटवरील गाड्या, भांडी, ब्लॉक, म्युझिक, लॅपटॉप या वस्तू पूर्वी ३० रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत मिळत होत्या. आता याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मागणी कमी झाली आहे. यापूर्वी हजारपासून तीन हजारपर्यंतच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक मोठ्या गाड्या घेऊन देत होते. त्याच वस्तू दहा हजारांपर्यंत गेल्यामुळे पालक या वस्तू घेऊन देत नाहीत.
लघु उद्योगांना चालना देण्यासाठी मेक इन इंडिया सुरू करण्यात आले. मात्र, उत्पादन निर्मितीची गुणवत्ता तेवढ्या प्रमाणात चांगली नसल्याने मागणी वाढली. परंतु, उत्पादन कमी असल्याने खेळण्यांच्या वस्तूंचे भाव तीनपट झाले आहेत. याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. त्यामुळे ग्राहकाचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- सुरेश जैन, अध्यक्ष, पुणे शहर व्यापारी असोसिएशन
खेळण्याच्या वस्तूमध्ये तीनपट वाढ झाल्याने आता लहान मुलांना खेळणी घेऊन देणे परवडत नाहीत. वाढत्या महागाईने सामान्य गरिबांचे कंबरडे मोडले आहे. आधीच हाताला काम नाही, त्यात मुलांचे शिक्षण, खेळणी आणि इतर खर्च वाढले आहेत. यात २०० ते ३०० वस्तू मिळत आहेत.
- दत्ता रास्ते, ग्राहक