आता गरिबांनाही मिळणार हायफाय आणि मोफत उपचार; पुण्यात आणखी दहा धर्मादाय हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:40 AM2023-09-11T11:40:40+5:302023-09-11T11:40:52+5:30
त्याचा फायदा गरीब रुग्णांना माेफत उपचार मिळण्यासाठी हाेणार आहे...
पुणे : धर्मादाय विभागांतर्गत पुण्यात याआधी ५६ हाॅस्पिटल हाेते. मात्र, पुण्याच्या धर्मादाय कार्यालयाने नव्याने माहिती घेतली असून, आणखी दहा हाॅस्पिटलची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण धर्मादाय रुग्णालयांची संख्या ५६ वरून ६६ झाली आहे. त्याचा फायदा गरीब रुग्णांना माेफत उपचार मिळण्यासाठी हाेणार आहे.
धर्मादाय विभागाकडे विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, ट्रस्ट, एनजीओ यांची नाेंद असते. या संस्थेच्या अंतर्गत सामाजिक कार्यासाठी हाॅस्पिटल तयार केले जातात. ज्या हॉस्पिटलचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांवर असते, ते धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येतात. पुण्यात काही संस्थांनी अशी हाॅस्पिटल काढली, परंतु त्यांची कल्पना धर्मादाय कार्यालयाला दिली नव्हती. उलट आम्ही ‘त्यातले’ नाहीच असाच त्यांचा समज हाेता.
धर्मादाय विभागातील रुग्णालयांना विविध सवलती देण्यात येतात. यामध्ये नाममात्र दरात जागा दिली जाते. जास्त एफएसआय, प्राॅपर्टी टॅक्समध्ये सवलत, पाणी, वीजबिल आदींमध्ये एखाद्या ट्रस्टला ज्या सवलती लागू हाेतात, त्या सर्व सवलती दिल्या जातात. त्यामुळे पुण्यात अनेक मोठ्या रुग्णालयांनी धर्मादायमध्ये नाेंद केली आहे. यामध्ये रूबी हाॅल क्लिनिक, जहांगीर, पूना हाॅस्पिटल, सह्याद्री हाॅस्पिटल, दीनानाथ मंगेशकर, संचेती हाॅस्पिटल, इनलॅक्स व बुधराणी हाॅस्पिटल यांच्यासह पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील मिळून ५६ हाॅस्पिटलचा समावेश आहे.
दरम्यान, धर्मादाय कार्यालयाने अशा हाॅस्पिटलचा शाेध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना या हॉस्पिटलची माहिती मिळाली आणि त्यांना रीतसर नाेटीस पाठवून त्यांची नाेंद धर्मादाय कार्यालयाकडे करून घेतली आहे. त्यामुळे आता त्यांनाही धर्मादाय विभागाच्या नियमाप्रमाणे रुग्णांना सवलती द्याव्या लागणार आहेत.
हाॅस्पिटलला काेणते नियम लागू हाेणार?
हे हाॅस्पिटल धर्मादायच्या अंतर्गत आल्याने त्यांना धर्मादायची ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमच्या कलम ४१ क अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये गरीब रुग्णासाठी तयार केलेली ‘आयपीएफ याेजना’ लागू झाली आहे. त्यानुसार त्यांना एकूण उत्पन्नापैकी दाेन टक्के निधी गरीब रुग्णांवर माेफत, सवलतीच्या दरात उपचार करावे लागणार आहेत.
रुग्णांना काय फायदा हाेणार?
रुग्णालयाच्या एकूण खाटांपैकी दहा टक्के खाटा या आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी (ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ६० हजारांच्या आत) आहेत. त्यांना एकूण बिलामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येते. या व्यतिरिक्त १० टक्के खाटा या निर्धन घटकांतील रुग्णांसाठी (ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजारांच्या आत) आहेत. या रुग्णांना पूर्णपणे माेफत उपचार करणे बंधनकारक आहे.
ही आहेत नवीन हाॅस्पिटल
१. दीनदयाळ मेमाेरियल हाॅस्पिटल, एफ.सी. राेड, पुणे
२. गिरीराज हाॅस्पिटल, बारामती, पुणे
३. एस. हाॅस्पिटल, पुणे
४. प्रशांती कॅन्सर केअर मिशन, सेनापती बापट राेड, पुणे
५. वैद्य पी. एस. नानल रुग्णालय, कर्वे राेड, पुणे
६. परमार हाॅस्पिटल, औंध, पुणे
७. डाॅ. जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर, पुणे
८. साळी हाॅस्पिटल, मंचर, पुणे
९. संजीवनी हाॅस्पिटल, कर्वे राेड, पुणे
१०.जाेशी हाॅस्पिटल, सेनापती बापट राेड, पुणे
धर्मादायच्या अंतर्गत आणखी नवीन १० हाॅस्पिटल आली आहेत. त्याबाबत त्यांच्या विश्वस्तांशी बाेलून हे नवीन हाॅस्पिटल समाविष्ट करून घेतले आहेत. आता त्यांना धर्मादाय विभागाचे नियम लागू झाले आहेत. यामुळे आणखी रुग्णांना सवलतीच्या दरांत व माेफत उपचार मिळण्यास मदत हाेणार आहे.
- सुधीरकुमार बुक्के, सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग