पीएमपीच्या सीएनजी बससाठी आता 'फिक्स' चालक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:48 PM2019-09-09T14:48:49+5:302019-09-09T14:49:47+5:30
पीएमपीच्या नवीन सीएनजी बसेससाठी तीन वर्ष एकच चालक फिक्स करण्यात येणार आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपीएल) दाखल होणाऱ्या नवीन सीएनजी बससाठी तीन वर्ष चालक ‘फिक्स’ करण्यात येत आहेत. एकाच चालकाच्या हाती स्टेअरिंग असल्यास बसची चांगल्यारितीने देखभाल ठेवली जाईल. तसेच बस व चालकाचे भावनिक नाते जुळण्यास मदत होईल, या अपेक्षेने ‘फिक्स’ चालकाची नेमणुक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पीएमपीच्या ताफ्यात १५० हून अधिक नवीन सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. तसेच आणखी २५० बस दाखल होणार आहेत. या बससाठी प्रशासनाकडून धोरण तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत ‘पीएमपी’मध्ये प्रत्येक बसवर किमान तीन महिन्यांसाठी चालकाची नेमणुक केली जात होती. मागील वर्षी ताफ्यात आलेल्या मिडी बससाठीही हेच धोरण होते. पण नवीन सीएनजी बससाठी या धोरणात बदल करण्यात आला असून चालकांची नेमणुक थेट तीन वर्षांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चालकांना बसही देण्यात आल्या आहेत. या बस व चालकांना मार्गही निश्चित करण्यात येत आहेत. बहुधा मार्ग बदलला जाणार नाही. या चालकाला सुट्टी असल्यास तीन चालकांमागे एक चालक पर्यायी म्हणून दिला जाणार आहे. पीएमपीमध्ये पहिल्यांदाच असे धोरण ठरविण्यात आले आहे.
एकच बस तीन वर्ष एकाच चालकाच्या ताब्यात राहणार आहे. त्यामुळे चालकाकडून संबंधित बसची दररोज चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जाईल. चालकाला बसमधील तांत्रिक बाबींची माहिती असेल. बसविषयीच्या तक्रारी, त्याची दुरूस्ती यासाठी चालक आग्रही राहू शकेल. बसमधील प्रत्येक बारकावे चालकाला माहिती असल्याने या बसचे ब्रेकडाऊन होणार नाही. एकप्रकारे या बसची संपुर्ण जबाबदारीच चालकांवर राहील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, सध्या ताफ्यातील जुन्या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक आहे. या बसची देखभाल-दुरूस्ती करण्यात अनेक अडचणी येतात. अनेकदा चालक बदलत असल्याने बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. नव्या धोरणानुसार ही स्थिती बदलणार आहे.
... तर इतर चालकांवर अन्याय
पीएमपीमध्ये नजिकच्या काळात नव्याने एकुण ४०० सीएनजी बस येणार आहेत. प्रत्येक बसला एक चालक तीन वर्षांसाठी दिल्यास इतर चालकांना या बस मिळणार नाहीत. त्यांना जुन्या बसवर काम करावे लागेल. सध्याची जुन्या बसची स्थिती दयनीय आहे. सततची ब्रेकडाऊन तसेच खिळखिळ्या बसमुळे चालकही त्रासले आहेत. त्यामुळे नव्या बसवर चालक फिक्स केल्यास इतर चालकांवर अन्याय केल्यासारखे होईल. तीन वर्ष हा खुप मोठा कालावधी आहे, असे काही चालकांनी सांगितले.