आता बारावीनंतर उडवा विमान, पुणे विद्यापीठात अभ्यासक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:20 AM2019-07-31T03:20:46+5:302019-07-31T03:21:00+5:30
केवळ २० विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे,
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे ‘बी.टेक. एव्हिएशन’ हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे देशात प्रथमच बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. केवळ २० विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे, असे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने पदव्युत्तर एम. टेक. एव्हिएशन अभ्यासक्रम सुरू केला आहे. परंतु आता विज्ञान शाखेतून ‘पीसीएम ग्रुप’ घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी.टेक.एव्हिएशनला प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. व्यवस्थापन परिषदेने या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.
डॉ. अभ्यंकर म्हणाले, विद्यापीठाने अमेरिका, दक्षिण अफ्रिका आणि जर्मनी या देशातील एव्हिएशन क्षेत्रातील नामांकित प्रशिक्षण संस्थांबरोबर करार केले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करताना दीड वर्ष प्रत्यक्ष विमान उडविण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. तर अडीच वर्षे एव्हिएशन क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क ४० ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान आहे.