आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 1, 2024 06:21 PM2024-06-01T18:21:55+5:302024-06-01T18:25:01+5:30

ससून रुग्णालयात दाेन डाॅक्टरांनी अल्पवयीन आराेपीचा रक्ताचा नमुना बदलल्याचे प्रकरण नुकतेच घडले आहे...

Now in Sassoon hospital in narcotic cases, along with blood, samples of the urine of the accused will be taken! Committee recommendation | आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस

आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस

पुणे : नार्काेटिक म्हणजेच अमली पदार्थ सेवनाची शक्यता असलेल्या आराेपींनाही वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात (कॅज्युअल्टी) आणले जाते. त्यावेळी त्यांची केवळ रक्ताची तपासणी केली जाते. आता त्यांच्या लघवीचेही नमुने घ्यावेत, अशी शिफारस रक्ततपासणी प्रकरणात हेराफेरीची चाैकशी केलेल्या समितीने केली आहे.

ससून रुग्णालयात दाेन डाॅक्टरांनी अल्पवयीन आराेपीचा रक्ताचा नमुना बदलल्याचे प्रकरण नुकतेच घडले आहे. त्या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे आणि इतर रुग्णालयाच्या दाेन प्राध्यापक सदस्यांच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली हाेती. या समितीने या प्रकरणाची चाैकशी करून वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर केला. त्यामध्ये काही शिफारशी करण्यात आल्या असून, त्यांपैकी ही एक शिफारस करण्यात आली आहे.

चाैकशी समितीने म्हटले आहे की, अमली पदार्थ सेवनाची शक्यता असलेल्या प्रकरणातील आराेपींचे ससूनमध्ये रक्तनमुन्यांसह लघवी तपासणेदेखील अभिप्रेत आहे. त्याबाबत न्यायसहायक प्रयाेगशाळा यांच्याशी सल्लामसलत करून आराेपींच्या लघवीचेही नमुने घ्यावेत. सीएमओ ड्यूटी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्यायवैद्यकीय प्रकरण हाताळणी करताना काही कालावधीनंतर ट्रेनिंग देणे गरजेचे आहे.

आपत्कालीन विभागातून ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या एमएलसी रुग्णांना (इनडाेअर एमएलसी) आणि ओपीडी एमएलसी अशी दाेन वेगळी रजिस्टर एकत्र ठेवावीत. तसेच सीएमओ यांनी एमएलसी रुग्णांची तपासणी, रक्तनमुने घेणे, लेबल लावणे, सीलबंद करणे व पाेलिसांच्या ताब्यात देणे हे व्यक्तिश: तसेच स्वत:च्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे.

अधिष्ठाता यांनी चाैकशी केलीच नाही

चाैकशी समितीने ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. त्यात म्हटले आहे की, अधिष्ठाता यांनी या प्रकरणाचे शासकीय व सामाजिक गांभीर्य ओळखून यापूर्वीच वेळेत चाैकशी करून याची माहिती शासनाला दिली असती तर, ससून रुग्णालय प्रशासनाकडून स्वत: पाेलिस तपासात अधिक सहकार्य झाले असते. तसेच याद्वारे ससून रुग्णालयाची प्रतिमा राखली गेली असती. तसेच, डाॅ. तावरे हे दीर्घ रजेच्या सुटीवर असताना ते एक दिवस आधीच कर्तव्यावर हजर झाले.

चाैकशी समितीने अमली पदार्थ सेवनाची शक्यता असल्याच्या प्रकरणात आराेपीचे लघवीचे नमुने घेण्याची शिफारस केली आहे. परंतु, लघवीने नमुने प्रामुख्याने अमली पदार्थाचे सेवन केले आहे का नाही? याची खात्री करण्यासाठी घेतले जातात. आपल्याकडे अमली पदार्थांची तपासणी करण्याची सुविधा नाही. याबाबत विचार करून याेग्य ताे निर्णय घेण्यात येईल.

-डाॅ. चंद्रकांत म्हस्के, प्रभारी अधिष्ठाता, ससून रुग्णालय

Web Title: Now in Sassoon hospital in narcotic cases, along with blood, samples of the urine of the accused will be taken! Committee recommendation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.