...आता शब्दहौशी खेळामधून होतोय मराठीचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 11:32 AM2019-11-20T11:32:30+5:302019-11-20T11:36:03+5:30
भाषेच्या प्रचार आणि प्रसाराच्या हेतूने ‘हौजी’ या लोकप्रिय खेळाच्या धर्तीवर ‘मराठी शब्दहौशी’ या खेळाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे...
पुणे : लहान मुलांवरील इंग्रजीचा पगडा वाढत असताना मराठी भाषेचे जतन, संवर्धन गरजेचे आहे. मुलांना मराठीची गोडी लागावी, हसत-खेळत भाषिक विकास व्हावा, यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. भाषेच्या प्रचार आणि प्रसाराच्या हेतूने ‘हौजी’ या लोकप्रिय खेळाच्या धर्तीवर ‘मराठी शब्दहौशी’ या खेळाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. राज्यभरातील शाळांमध्ये याबाबत प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. खेळाप्रमाणेच स्वर आणि व्यंजने लिहिलेल्या पत्त्यांवर मराठीतील नामवंत साहित्यिकांची माहिती दिलेली आहे.
मराठी माणसाला मराठीतील स्वर, व्यंजने मराठी विचारली तर कदाचित पटकन उत्तर देता येणार नाही; पण खेळाच्या माध्यमातून हाच पाया पक्का व्हावा, हा ‘मराठी शब्दहौशी’ या खेळाचा उद्देश आहे.
सुरुवातीला हा खेळ भिलार या पुस्तकांच्या गावी उपलब्ध करून देण्यात आला. नागरिकांचा प्रतिसाद पाहता, संस्थेने या खेळाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित केली आहे. या खेळाची संकल्पना विजय देशपांडे यांची असून त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रा. सोनाली गुजर यांनी या संकल्पनेचा विकास केला.
हौजीमध्ये ज्याप्रमाणे खेळ घेणारा एक-एक आकडा सांगतो आणि खेळणारे आपल्याकडील कागदावरील आकडा खोडतात, त्याचप्रमाणे या खेळामध्ये खेळ घेणारा आपल्याकडील ५४ पत्त्यांमधून एकामागे एक स्वर किंवा व्यंजन सांगेल.
आपल्याकडे असलेल्या चिठ्ठीमध्ये ते स्वर किंवा व्यंजन असेल तर ते खोडायचे, असे स्वरूप आहे. या चिठ्ठीत दोन शब्द देण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीचा पहिला शब्द किंवा दुसरा शब्द पूर्ण खोडला जाईल, तो पहिल्या शब्दाचा किंवा दुसºया शब्दाचा विजेता घोषित होईल. ज्याच्याकडील दोन्ही शब्द खोडले जातील, तो पूर्ण शब्दहौशीचा विजेता ठरेल. हा खेळ सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि विविध वयोगटांच्या लोकांमध्ये राज्य मराठी विकास संस्थेतर्फे घेण्यात येत असून त्याला उत्तम प्रतिसाद असल्याचे संस्थेचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. आनंद काटीकर यांनी सांगितले.
खेळाप्रमाणेच स्वर आणि व्यंजने लिहिलेल्या पत्त्यांवर मराठीतील नामवंत साहित्यिकांची माहिती दिली आहे. यामध्ये साहित्यिकाचे छायाचित्र, त्यांचे जन्म व मृत्यू वर्ष पुढील बाजूला देण्यात आले आहे. मागील बाजूला या साहित्यिकाचे पूर्ण नाव, त्यांचे टोपणनाव, साहित्यसंपदा, त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान, अशी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मराठी साहित्यिकांची माहिती होण्यासाठीही या खेळाचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. आपण विधि साहित्यिकांची पुस्तके वाचतो; पण त्यांची आपल्याला विस्तृत माहिती नसते.
.....
मराठीचा विकास, महाराष्ट्राचा विकास’ हे संस्थेचे बोधवाक्य आहे. मराठीचा विकास करायचा असल्यास भाषेचा जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संस्था विविध उपक्रम राबवत असते. खेळाच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत मराठी पोहोचविण्याचे काम मराठी शब्दहौशीच्या माध्यमातून करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी हा खेळ घ्यावा आणि मराठीचा जागर करावा. - प्रा. डॉ. आनंद काटीकर