आता मुठा नदीसुद्धा म्हणतेय मी टू...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:59 PM2018-12-27T14:59:48+5:302018-12-27T16:51:25+5:30
सध्या पुण्यातील मुठा नदी सुद्धा मी टू म्हणत तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत आहे. भिडे पुलावर एक फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या माध्यमातून मुठा नदीवर वर्षानुवर्षे हाेत असलेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यात येत आहे.
पुणे : काही महिन्यापूर्वी मी टू या चळवळीने अख्खा देश ढवळून निघाला हाेता. या चळवळीच्या माध्यमातून अनेक महिला पुढे आल्या. त्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडली. सध्या पुण्यातील मुठा नदी सुद्धा मी टू म्हणत तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत आहे. भिडे पुलावर एक फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या माध्यमातून मुठा नदीवर वर्षानुवर्षे हाेत असलेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यात येत आहे. सध्या हा फ्लेक्स येथून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हॅश मी टू. गेली कित्येक दशकं हे माझ्या संमतीशिवाय हाेत आलंय. कधी माझ्या गर्भातुनवाळु उपसा तर कधी घरघरातील सांडपाणी, कधी निर्माल्या्च्या रुपात कचरा तर कधी असभ्य, असंस्कृतांची मनमानी. हाे, मी पिडीत आहे. असे या फ्लेक्सवर लिहीण्यात आले आहे. तसेच नदी प्रदुषित अथवा काेणतेही सार्वजनिक जलप्रवाह प्रदुषण करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम 277 च्या अंतर्गत 3 महिने कारावास, दंड किंवा दाेन्ही या कलमास पात्र राहिल असेही या फ्लेक्सवर लिहून साैजन्य माय लाॅयर पुणे यांना देण्यात आले आहे. हा फ्लेक्स नेमका काेणी लावला हे माहित नसले तरी यावर लिहीण्यात आलेला संदेश पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
सध्या मुठा नदीबराेबरच इतर नद्यांची अवस्था पाहता ती अत्यंत बिकट आहे. मुठेच्या पात्रात ठिकठिकाणी कचऱ्याची बेटे तयार झाली आहेत. नदीपात्रात सांडपाणी साेडण्यात येत असल्याने पाणी माेठ्याप्रमाणावर प्रदूषित झाले आहे. नदीतील अनेक माशांच्या प्रजाती या नष्ट झाल्या आहेत. नदीतील संपूर्ण नैसर्गिक अधिवासच धाेक्यात आला आहे. महापालिकेकडून वेळाेवेळी निर्माल्य हे नदीत न फेकता निर्माल्य कलशात जमा करण्याचे आवाहन करण्यात येत असते. परंतु काही नागरिक याकडे दुर्लक्ष करत नदीतच निर्माल्य टाकत असतात. त्यामुळे नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असते. पालिका किंवा सरकारकडून नदीच्या प्रदूषणाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने सध्या शहरातील नद्यांचे रुपांतर गटारीत झाले आहे.