आता नवी वृक्ष प्राधिकरण समिती
By admin | Published: March 17, 2017 02:43 AM2017-03-17T02:43:15+5:302017-03-17T02:43:15+5:30
स्थापनेपासून वादविवादानेच गाजलेली महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करण्यात आली असून, नवी समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे
पुणे : स्थापनेपासून वादविवादानेच गाजलेली महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करण्यात आली असून, नवी समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पूर्वीच्या समितीपेक्षा नवी समिती कमी सदस्यांची असणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या ९८ सदस्यांमुळे आता या समितीवरही भाजपाचेच वर्चस्व असेल, असे दिसते आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाप्रमाणे पंचवार्षिक सभागृहाची मुदत संपताच वृक्ष प्राधिकरण समितीची मुदतही संपुष्टात येते. नव्या पंचवार्षिकमधील पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर १ महिन्याच्या आतच नवी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आयुक्तांनी नगरसचिव कार्यालयाला समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. नगरसेवकांपैकी किमान ५ ते कमाल १५ सदस्य नियुक्त करावे, असे महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंवर्धन व जतन कायद्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशासकीय सदस्य म्हणून ७ सदस्यांची नियुक्ती करता येते, त्यात विज्ञान शाखेच्या पदवीधारकांना प्राधान्य देण्यात यावे, असे म्हटले आहे.
राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक महापालिकेला वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
यापूर्वीच्या समितीत तब्बल २६ सदस्य होते. त्यातील १३ निवडून आलेले व १३ अशासकीय सदस्य होते. स्थापना झाल्यापासून ही समिती वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त होत गेली. त्यातील अशासकीय सदस्यांच्या पात्रतेवरच काही संस्थांनी हरकत घेतली.
काहीजणांनी थेट न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे समितीवर काही बंधने आली. त्यांचे काही निर्णयही वादग्रस्त झाले. आता नव्या निर्णयानुसार अशासकीय सदस्य म्हणून फक्त ७ जण घ्यायचे आहेत. त्यामुळे नगरसेवकांमधूनही ७ जणच घेतले जातील. आयुक्त
समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे समितीचे एकूण सदस्य १६ होतील.(प्रतिनिधी)