आता पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ४०% बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:55 PM2021-06-07T19:55:04+5:302021-06-07T19:56:06+5:30
रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेचा निर्णय
पुणे शहरात कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या लक्षात घेता आता खासगी रुग्णालयात कोरोना साठी महापालिकेने ताब्यात घेतलेले बेड कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये आता फक्त ४०% बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव असतील.
दुसऱ्या लाटेत पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पुणे शहरातल्या खासगी रुग्णालयांमध्ये असणारे बेड पुणे महापालिकेने ताब्यात घेतले होते. या रुग्णालयांमध्ये ८०% बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या इतकी होती की राखीव बेड असून देखील रुग्णांना बेड मिळवण्यासाठी रुग्णालयात फिरण्याची वेळ नागरिकांवर आली होती.
पण आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे. पुण्यात रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. त्यानंतर खाजगी रुग्णालयामध्ये आता इतर रुग्णांसाठी बेड रिकामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आता प्रत्येक खासगी रुग्णालयात ४०% बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव असतील.
याविषयी बोलताना अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या ," पुणे महापालिका क्षेत्रात कमी झालेल्या संसर्गामुळे बेड मोकळे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आज यासंदर्भातील आदेश काढले आहेत. सध्या या रुग्णालयांना दिलासा दिला असला तरी आवश्यकता भासली तर त्यांना दोन दिवसांमध्ये हे बेड परत कोरोना चा उपचारांसाठी उपलब्ध करून द्यावे लागतील."