...आता आपला सह्याद्री गरीब झाला आहे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:34 PM2019-09-16T12:34:57+5:302019-09-16T12:35:25+5:30
आताच पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर नजीकचा भविष्यकाळ मानवाकरिता अवघड असेल...
पुणे : राज्यातील जंगले आता उजाड होत चालली आहेत. शासनानेच काही आहे ते करावे अशी आपली मानसिकता कधी बदलणार? अशाने पर्यावरणाचे भले होणार नाही. आताच पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर नजीकचा भविष्यकाळ मानवाकरिता अवघड असेल. झाडे ही टिकवावी लागतात. ती तोडावीच लागतात असे नाही. पर्यावरणाविषयक संवेदनशीलता हरपत चालल्यानेच की काय आता आपला सह्याद्री गरीब झाला आहे, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि राजहंस प्रकाशन प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. संदीप श्रोत्री लिखित ‘मनु’चे अरण्य या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या सोहळयाला प्रख्यात अभिनेते व पर्यावरणमित्र मिलिंद गुणाजी, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, अभियंता दीपक मोडक, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मसापचे शहर प्रतिनिधी शिरीष चिट्णीस उपस्थित होते.
पर्यावरणाची दिवसेंदिवस होत चाललेली हानी यावर परखड मत व्यक्त करताना पुरंदरे म्हणाले, देशात खरोखर माणसे राहतात का? हा प्रश्न पडतो. आपण आपल्या देशातील पर्यावरणाची स्थिती बघावी मग आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करावा. जंगले उजाड होत चालली आहेत. गौरवशाली, वैभवशाली अशा सह्याद्री आता खुप उजाड पडला आहे. त्यावर झाड नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात पर्यावरणविषयक महत्वाचे विचार मांडले होते. याचा आपल्या सर्वांना विसर पडला आहे. जंगले वाचवा ती मरु देऊ नका. प्रत्यक्षात शहरातील माणसांच्या दारात साधी तुळसदेखील पाहवयास मिळत नाही. आमच्याकडे केवळ उत्सव साजरे केले जातात. दुसरीकडे झाडांवर क्रुर व निष्ठुरपणे हल्ले होतात. निदान प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. अशा शब्दांत बाबासाहेबांनी पर्यावरणविषयक भावना व्यक्त केल्या.
गुणाजी यांनी डॉ. श्रोत्री यांच्या पुस्तकातील महत्वाच्या मुद्यांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले. अँमेझॉनमधील प्राणी-पक्षी जीवन, निसर्गवाचन याबद्द्लच्या विविध छटा वाचकांना मनुच्या अरण्यातून वाचावयास मिळतील. याप्रसंगी त्यांनी आपल्या निसर्गप्रेमावर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. जोशी म्हणाले, निसर्गाचे वेगवेगळे रुप त्याचा परिचय पुस्तकाच्या निमित्ताने पर्यावरण अभ्यासक व वाचकांना होईल. त्यात पर्यावरणविषयक जागृती तर आहेच याशिवाय त्याची संवेदनशीलता जपण्यात आली आहे. निसर्गाचा ºहास करुन मानवाची प्रगती होणार नाही. याचा विचार त्याने करण्याची गरज आहे.