आता पीएच.डी.चे होणार ट्रॅकिंग
By admin | Published: October 16, 2015 01:29 AM2015-10-16T01:29:03+5:302015-10-16T01:29:03+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशप्रक्रियेसाठी ट्रॅकिंग सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पीएच.डी.साठी नोंदणी केल्यानंतर आपला प्रबंध कोणत्या टप्प्यावर आहे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशप्रक्रियेसाठी ट्रॅकिंग सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पीएच.डी.साठी नोंदणी केल्यानंतर आपला प्रबंध कोणत्या टप्प्यावर आहे, त्याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला समजू शकणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या सर्व विभागांतील प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनासाठी ‘रिसर्च पोर्टल’ तयार करण्याचे काम विद्यापीठाने हाती घेतले आहे. येत्या महिनाभरात या दोन्ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत, असे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले.
पीएच.डी.साठी प्रवेश घेतल्यानंतर दर सहा महिन्यांनी प्रोग्रेस रिपोर्ट विद्यार्थी मार्गदर्शकांकडे केला जातो. त्याचप्रमाणे प्रबंध जमा केल्यानंतर त्याची सद्य:स्थिती काय आहे, हे विद्यार्थ्यांना समजत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना वारंवार विद्यापीठ आणि मार्गदर्शकांकडे चौकशी करावी लागते. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिस्टीमनुसार विद्यार्थ्यांना आपले प्रबंध कोणत्या टप्प्यावर आहेत, हे समजणे शक्य होईल. विद्यार्थ्यांना कोड नंबरद्वारे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून प्रबंधाची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पीएच.डी. प्रक्रियेत होणारी दिरंगाई टाळता येईल.