आता कैदीही चालविणार सलून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 09:30 AM2020-01-17T09:30:00+5:302020-01-17T09:30:02+5:30
Yerwada Jail : येरवडा कारागृहात कैद्यांमार्फत सलून चालविण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना सुधारण्याची संधी मिळणार आहे.
राहुल गायकवाड
पुणे : रागाच्या भरात हातून एखादा गुन्हा घडताे आणि त्यानंतर अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागतात. शिक्षा भाेगून आल्यानंतरही समाज अशा कैद्यांना अनेकदा स्विकारत नाही. कैदी जरी असला तरी त्याला सुधारण्याची संधी मिळावी यासाठी येरवडा कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आता जेल प्रशासनाकडून चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांद्वारे सलून चालविण्यात येणार आहे. या माध्यमातून शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांना सुधारण्याची एक संधी देण्यात येणार आहे.
कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांचे कारागृह प्रशासनाकडून पुर्नवसन करण्यात येते. येरवडा कारागृहात कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबराेबर त्यांच्याकडून विविध कामे करुन घेतली जातात. कैदी कारागृहात कामात गुंतलेले राहून रहावेत तसेच त्यांना सुधारण्याची संधी मिळावी हा यामागील हेतू असताे. दरवर्षी कराेडाे रुपयांची उलाढाल ही कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंपासून हाेत असते. कारागृहाचे येरवडा भागात एक शाेरुम सुद्धा असून तेथे कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीस ठेवण्यात येतात. यात बेकरी पदार्थांपासून ते गृहउपयाेगी वस्तूंचा समावेश आहे.
कारागृहाच्या माध्यामातून आता कैद्यांद्वारे सलून चालविण्यात येणार आहे. यामध्ये पाच ते सहा कैद्यांना काम देण्यात येणार आहे. खुल्या कारागृहातील चांगल्या वर्तनुकीचे हे कैदी असणार आहेत. त्याचबराेबर इस्त्रीचे नवीन शाॅप सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून कैद्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या अगाेदर देखील कारागृहाच्या माध्यामातून कैद्यांद्वारे वाॅशिंग सेंंटर तसेच इस्त्री शाॅप चालविण्यात येत आहे. बाजारभावपेक्षा कमी पैशात सलून आणि इस्त्री शाॅप चालविण्यात येणार आहे. या शाॅप्सचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी चार वाजता हाेणार आहे.
याविषयी बाेलताना येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार म्हणाले, कैद्यांच्या पुनर्वसनासाठी कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. या माध्यमातून कैदी शिक्षा भाेगून बाहेर पडल्यानंतर त्यांना व्यवसाय सुरु करता येऊ शकेल. या आधी कैद्यांमार्फत वाॅशिंग सेंटर तसेच इस्त्री शाॅप चालविण्यात येत आहे. आता कैद्यांमार्फत सलून देखील चालविण्यात येणार असून याद्वारे पाच ते सहा कैद्यांच्या हाताला काम मिळणार आहे. त्याचबराेबर नागरिकानांदेखील कमी पैशामध्ये या सुविधा मिळणार आहेत. सलूनचे सर्व प्रशिक्षण कैद्यांना देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कैद्यांना इतर लाेकांसाेबत मिसळता येणार असून सुधारण्याची एक संधी मिळणार आहे.