आता पुण्यात तयार हाेतीये विनाेदविरांची फाैज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 08:50 PM2018-10-24T20:50:55+5:302018-10-24T21:02:58+5:30
पुण्यातील अनेक कॅफेमध्ये स्टॅण्डअप काॅमेडी तसेच अाेपन माईकच्या कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येत असून तरुणांचा याला चांगला प्रतिसाद मिळत अाहे.
पुणे : काही वर्षांपूर्वी अनेक वाहिन्यांवर विनाेदी कार्यक्रम दाखवले जात असे. त्यातून अनेक विनाेदवीर पुढे अाले. अनेकांना सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली. सध्या पुण्यातील अनेक कॅफेजमध्ये स्टॅण्डअप काॅमेडी अाणि अाेपन माईकचे अायाेजन करण्यात येत असून यामधून नवाेदित विनाेदविरांची फाैज तयार हाेत असल्याचे चित्र अाहे.
नाटक, सिनेमापर्यंत मर्यादित असलेले मनाेरंजन अाता विस्तारत अाहे. कॅफेचे स्वरुप अाता फक्त काॅफी पिण्यासाठीची निवांत जागा यावरुन नवाेदित कलाकारांसाठीचे व्यासपीठ म्हणून उदयास येत अाहे. सध्या पुण्यातील अनेक कॅफेजमध्ये स्टॅण्डअप काॅमेडी अाणि अाेपन माईकच्या कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येत असून तरुणांचा याला माेठा प्रतिसाद मिळत अाहे. तरुण वाचत नाहीत, त्यांना जगात घडणाऱ्या घडामाेडींबाबत फारशी माहिती नसते, अशी अाेरड अनेकदा हाेत असते. परंतु हा समज खाेडून काढत अनेक कॅफेजमध्ये तरुणांकडून वाचन कट्टे चालविले जात अाहेत. यात काॅफिचा अास्वाद घेत पुस्तकांचे, लेखांचे वाचन केले जाते. या कार्यक्रमांना देखील तरुणांची माेठी गर्दी हाेत असते. स्टॅण्डअप काॅमेडी सारखे कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह दाखवले जात असल्याने येथे सादरिकरण करणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळत असून याद्वारे एक नवीन राेजगाराची संधी तरुणांना निर्माण झाली अाहे.
पुण्यात अायटी कंपन्यांची संख्या अधिक अाहे. या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे साधारण 20 ते 40 या वयाेगटातील असतात. त्यांना विकेंडला मनाेरंजनाचे साधन हवे असते. त्यातच टिव्हीवर कार्यक्रम पाहण्यापेक्षा माेबाईलवर अाॅनलाईन व्हिडीअाे पाहणाऱ्यांची संख्या अधिक अाहे. त्यातच स्टॅण्डअप काॅमेडी सारखे कार्यक्रम प्रत्यक्षात बघण्यात एक वेगळीच मजा असल्याने या कार्यक्रमांकडे तरुणांचा अाेघ वाढत अाहे. पुण्यातील एफसीराेड, हिंजवडी, बाणेर, अाैंध, काेरेगाव पार्क, कल्याणीनगर या भागांमधील कॅफेजमध्ये विकेंडला अशा कार्यक्रमांचे अायाेजन केले जात अाहे. अाेपन माईक सारख्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांमधील लाेकांनाही अापली कला सादर करण्याची संधी मिळत असल्याने अनेकांचा अात्मविश्वास बळवण्यास यामुळे मदत हाेत अाहे.