आता पुण्यातही ‘बाईक आॅन रेन्ट’
By admin | Published: January 29, 2015 02:29 AM2015-01-29T02:29:17+5:302015-01-29T02:29:17+5:30
गोवा, बंगळुरूमधील ‘बाईक आॅन रेन्ट’चा फंडा आता पुण्यातही आला आहे. लवकरच पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही फिरण्यासाठी भाडेतत्त्वावर दुचाकी मिळणार आहे
पुणे : गोवा, बंगळुरूमधील ‘बाईक आॅन रेन्ट’चा फंडा आता पुण्यातही आला आहे. लवकरच पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही फिरण्यासाठी भाडेतत्त्वावर दुचाकी मिळणार आहे. परिवहन विभागाने एका खासगी कंपनीला १० दुचाकी गाड्यांसाठी याबाबत परवानगी दिली असून, पुढील महिन्यात या गाड्या रस्त्यांवरून धावतील. राज्यात पहिल्यांदाच ‘बाईक आॅन रेन्ट’ ही संकल्पना अस्तित्वात येणार आहे.
पर्यटनासाठी जगभरातून गोव्यात पर्यटक येत असतात. त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे गोवा फिरता यावा यासाठी भाडेतत्त्वावर दुचाकी पुरविल्या जातात. गोव्यात ही संकल्पना खूप लोकप्रिय झालेली आहे. त्याचप्रमाणे बंगळुरूमध्येही या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॅब, टॅक्सी किंवा रिक्षा यांसारख्या वाहनांमधून प्रवास करताना जास्त खर्च येत असल्याने अनेक जण भाडेतत्त्वावरील दुचाकींचा वापर करतात. आता ही संकल्पना राज्यात पहिल्यांदाच पुण्यात आली आहे. आयटी हब म्हणून लोकप्रिय असलेले पुणे पर्यटकांसाठीही महत्त्वाचे शहर बनत आहे. तसेच पुण्यात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. या सर्वांनाच शहरात फिरण्यासाठी रिक्षा, कॅब किंवा पीएमपीचा वापर करावा लागतो. मात्र, अनेकांना रिक्षा, कॅबचे भाडे परवडत नाही. त्यांच्यासाठी भाडेतत्त्वावरील बाईक फायदेशीर ठरू शकते.
याविषयी अधिक माहिती देताना स्नॅप बाईक्स या कंपनीचे व्यवसाय विकास व्यवस्थापक आशिष इंगळे म्हणाले, की परिवहन आयुक्तालयाने त्यासाठी कंपनीला १० दुचाकींचा परवाना दिला आहे. आरटीओकडे दुचाकींची नोंदणी झाली असून, लवकरच या गाड्या भाडेतत्त्वावर दिल्या जातील. प्रत्येक गाडीला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. भाडे अद्याप निश्चित नाही. हे भाडे एका दिवसासाठी निश्चित केले जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच असा परवाना देण्यात आला आहे.