आता रेशनधान्य कोणत्याही दुकानातून घेता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:15+5:302021-07-09T04:08:15+5:30
लाभ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेशनिंग दुकानदारांकडून धान्य घेण्यासाठी गेल्यानंतर नागरिकांची अडवणूक केली जाते. एखाद्या रेशनिंग दुकानदाराकडून अशी ...
लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेशनिंग दुकानदारांकडून धान्य घेण्यासाठी गेल्यानंतर नागरिकांची अडवणूक केली जाते. एखाद्या रेशनिंग दुकानदाराकडून अशी अडवणूक केली जात असले, तर नागरिकांना आपल्या जवळच्या अन्य कोणत्याही रेशनिंग दुकानात जाऊन धान्य घेता येऊ शकते. शासनाने प्रत्येक लाभार्थ्याला धान्याचा लाभ घेता यावा, म्हणून ही पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात २० हजार १५६ रेशनकार्डधारकांनी या पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे.
कोरोना काळात शासनाने बहुतेक सर्व कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य वाटप केले. परंतु अनेक कुटुंबांनी या कालावधीत स्थलांतर केल्याने कोणत्याही पात्र लाभार्थ्याने आपले रेशनकार्ड व बारा अंकी नंबर दिल्यानंतर कोणत्याही रेशनिंग दुकानांमध्ये धान्य उपलब्ध करून देण्याची सवलत दिली. ही सवलत पूर्वीपासूनच असली तरी कोरोना काळात अनेकांना पोर्टेबिलिटीची लाभ घेता आला.
पुणे जिल्ह्यात तब्बल ८ लाख ९३ हजार ४२४ रेशनकार्ड धारक असून, यापैकी सध्या केवळ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लोकांनाच धान्य वाटप केले जात आहे. कोरोना काळात बहुतेक सर्वच कार्ड धारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य वाटप केले. याच कालावधीत अनेक रेशनिंग दुकानदाराबाबत तक्रारी देखील आल्या. अशा सर्व दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
-------
एकूण रेशनकार्डधारक - ८९,४२४
प्राधान्य क्रम - ५,२३,२९२
अंत्योदय - ४८,४५५
केसरी - २,८८,२९२
--------
जिल्ह्यात तालुकानिहाय पोर्टेबिलिटीचा लाभ घेतलेले रेशनकार्डधारक
तालुका दुकानदार बदललेल्या कार्डधारकांची संख्या
आंबेगाव 1630
बारामती 6316
भोर 271
दौंड 1553
हवेली 1441
इंदापूर 716
जुन्नर 1729
खेड 3104
मावळ 705
मुळशी 203
पुरंदर 540
शिरूर 1922
वेल्हा 26
एकूण 20156
-----------
जिल्ह्यातील शंभर टक्के लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ
पुणे जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चीत केल्यानुसार मोफत धान्य वाटप सुरू आहे. मे महिन्यात शंभर टक्के वाटप झाले असून, जून महिन्यात देखील ९५ टक्क्यांच्या पुढे मोफत धान्य वाटप करण्यात आले. बायोमेट्रिक सिस्टीमद्वारे हे वाटप करण्यात येत असून, कुठेही अडचण येत नाही.
----------