आता पतीसोबत नांदायला तयार, छळ प्रकरण पाच वर्षांनी निकाली
By नम्रता फडणीस | Published: December 4, 2023 03:16 PM2023-12-04T15:16:14+5:302023-12-04T15:17:15+5:30
पती, सासू, सासरा, दीर आणि जाऊची निर्दोष मुक्तता
पुणे: उलथण्याने चटके देणे, घरातून हाकलून देणे, घर व गाडीची मागणी, मारहाण करणे, टोमणे देणे, साडी घालण्यास हट्ट करणे सह विविध पध्दतीने छळ केल्याचा आरोप करीत विवाहितीने कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत दाखल केलेल्या दाव्यातून पती, सासू, सासरे, दीर आणि जावेची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी ५ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली. खडकी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.जी.दुबाळे यांनी हा आदेश दिला.
पती सुनील रघुनाथ भोसले (वय ३२), सासरे रघुनाथ शिवराम भोसले, दीर राहुल यांच्यासह सासू आणि जावेची मुक्तता केली आहे. याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहितेचा छळ करणे आणि संगनमतनुसार 2018 मध्ये विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. तर बचाव पक्षातर्फे अॅड.पुष्कर पाटील आणि अॅड. अनुज मंत्री यांनी कामकाज पाहिले. अॅड. पाटील यांनी युक्तिवाद केला की, फिर्यादीने त्रास देण्याच्या हेतूने खोटी तक्रार दाखल केली आहे. याच प्रमाणे तिने पोटगी मिळण्यासाठी वेगवेगळ्या न्यायालयात देखील खटले दाखल केले आहेत. तसेच, पती सोबत नांदण्याची इच्छा देखील दर्शविली. या व्यतिरिक्त पतीने अनेकदा तिला पर्यटन स्थळांवर फिरायला नेले व संपूर्ण खर्च केला. उलथण्याने चटके दिल्याचे सिध्द होत नाही. उलथणे देखील जप्त नाही. या व्यतिरिक्त कुठलाच ठोस पुरावा नाही.