आता तुमच्या गावातील भूजलाचा नकाशा पाहा ऑनलाइन; लवकरच येणार मोबाइल ॲप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:16 AM2023-04-17T10:16:08+5:302023-04-17T10:20:01+5:30

त्यासाठी ॲपवर काम सुरू असून, लवकर ते कार्यान्वित होणार आहे...

Now see your village groundwater map online; Mobile app coming soon | आता तुमच्या गावातील भूजलाचा नकाशा पाहा ऑनलाइन; लवकरच येणार मोबाइल ॲप

आता तुमच्या गावातील भूजलाचा नकाशा पाहा ऑनलाइन; लवकरच येणार मोबाइल ॲप

googlenewsNext

- श्रीकिशन काळे

पुणे : भूजल साठा दिवसेंदिवस खाली जात असून, जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या भागात किती भूजलसाठा आहे, त्याची माहिती असायला हवी. हेच ओळखून भूजल विभागाने राज्यातील सर्व गाव, शहरांचा भूजल नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. त्यावर आपण आपल्या गावातील भूजलाची स्थिती जाणून घेऊ शकतो. ही माहिती आता मोबाइल ॲपवर येणार आहे. त्यासाठी ॲपवर काम सुरू असून, लवकर ते कार्यान्वित होणार आहे.

लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. त्यात शेती, पिण्यासाठी, आद्यौगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर भूगर्भातून उपसा केला जातो. त्याप्रमाणात पावसाचे पाणी मात्र भूगर्भात सोडले जात नाही. त्यामुळे दरवर्षी भूजलाचा स्तर खोल जात आहे. मराठवाड्यात तर सातशे-आठशे फुटांपेक्षा अधिक खोल भूजल गेले आहे. तिथे जलपुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भूजल विभागाने प्रत्येक गावाचा भूजल नकाशा तयार केला आहे. तो भूजल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणीही आपल्या भागातील भूजलाची स्थिती तिथे जाऊन नकाशाद्वारे घेऊ शकतो.

नकाशात भूजलाचे पाच स्तर

नकाशामध्ये पाच स्तर केले आहेत. त्यामध्ये पहिल्या स्तरावर ज्या भागात अत्यंत प्राधान्याने काम करणे आवश्यक आहे, तिथे निळसर पट्टा दाखवला आहे. त्या ठिकाणी नाला खोलीकरण, विहिरींचे पुनर्भरण करणे, बांध बांधणे आदी कामे करण्याचे सुचविले आहे. जेणेकरून भूजल पातळी चांगली राहील. त्यानंतर पिवळा पट्टा दाखविला आहे. त्यात बांध, पुनर्भरण विहिरी, विंधन विहिरींचे पुनर्भरण करावे, भूमिगत बंधारे विरुद्ध दिशेने उतार असलेला नाला खोलीकरण करावे, शेततळे करावेत, पाझर तलाव करावा आदी कामे सुचविली आहेत. आणखी तीन स्तर आहेत. त्यामध्ये सलग समतल चर, पाझर चर, दगडी बांध, सलग समतल, शेततळे आदी कामे सुचविली आहेत.

असे पाहा नकाशा

पुणे, कोकण, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर असे सहा विभाग भूजलाच्या संकेतस्थळावर आहेत. त्यामध्ये गेल्यावर तालुका निवडावा आणि मग तुमच्या गावाचे नाव टाकावे. त्याचा नकाशा ओपन होईल. तिथे प्रत्येक भागावर प्राधान्यक्रमाचे पट्टे केले आहेत. नागरिकांना https://gsda.maharashtra.gov.in/index.php/GWRechargePriorityMap या लिंकवर नकाशा पाहायला मिळतील.

भूजलाचा नकाशा सध्या संकेतस्थळावर आहे; पण आम्ही आता अजून आधुनिक पाऊल उचलले आहे. भूजलाचे नकाशे मोबाइल ॲपवर उपलब्ध होण्यासाठी आम्ही त्यावर काम करतोय. लवकरच त्याचे ॲप कार्यान्वित करण्यात येणार आहे.

- चिंतामणी जोशी, आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे

राज्यात भूजलाची पातळी वाढविणे गरजेचे आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे आम्ही नुकतेच मराठवाड्यातील शंभर गावांमधील छतांवर ही यंत्रणा उभारली आहे. ती सर्वांनी उभारली तर राज्याचा भूजल साठा वाढू शकेल.

- निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, सदस्य, केंद्रीय जलशक्ती अभियान

Web Title: Now see your village groundwater map online; Mobile app coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.