पुणे शहरात आता मांजरींचीही होणार नसबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 12:36 PM2019-08-29T12:36:30+5:302019-08-29T12:40:10+5:30
पालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते.
पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची महापालिकेकडून नसबंदी केली जाते. आता भटक्या मांजरींना पकडून त्यांचीही नसबंदी करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिली.
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यांची पैदास रोखण्यासाठी पालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. तसेच त्यांचे लसीकरणही केले जाते. शस्त्रक्रिया व लसीकरणानंतर ही कुत्री पुन्हा पकडलेल्या ठिकाणी सोडली जातात. त्याच पद्धतीने आता भटक्या मांजरींवरही नसबंदी शस्त्रक्रियेसह लसीकरण केले जाणार आहे. याबाबतचे पत्र अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. भटक्या मांजरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लसीकरण करणे व त्यांची संख्या मर्यादित राहण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भारतीय जीव जंतू कल्याण मंडळाने केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचे आदेश दिले आहेत. पालिका हद्दीत आता भटक्या कुत्र्यांसह मांजरींचीची नसबंदी केली जाणार असून ६० महिने कालावधीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.