कांद्याचीही आता चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:57 AM2017-08-13T03:57:34+5:302017-08-13T03:57:37+5:30
कांद्याला सोन्याचा भाव आल्याने तो चक्क चोरी होऊ लागला आहे. साकोरे (ता. आंबेगाव) येथील दोन शेतकºयांच्या बराकीतील कांदा रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
मंचर : कांद्याला सोन्याचा भाव आल्याने तो चक्क चोरी होऊ लागला आहे. साकोरे (ता. आंबेगाव) येथील दोन शेतकºयांच्या बराकीतील कांदा रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. दोघांच्या बराकीतील ३१ गोण्या चोरून नेल्या आहे. या कांद्याची किंमत ४२ हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सासू आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी गाडे पत्नीसह निरगुडसर येथे गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यावर दोघे जेवण करून झोपी गेले. सकाळी ६.३० वाजता पत्नी सुमन गाडे उठून चालण्यासाठी रस्त्यावर गेले होते. त्या वेळेस रस्त्याच्या कडेला गाडे यांच्या कांद्याच्या बराकीच्या बाहेर दोन कांद्याच्या गोण्या भरलेल्या पडलेल्या होत्या. सुमन गाडे, तसेच तुळशीराम गाडे व त्यांचा मुलगा सुरेश बराकीजवळ गेले असता बराकीतील २५ गोणी कांदा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. शेतकरी गाडे यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र त्यांना चोरी झालेला कांदा आढळला नाही. यासंदर्भात तुळशीराम रामजी गाडे यांनी अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किमतीचा २५ पिशवी कांदा चोरून नेल्याची फिर्याद मंचर पोलिसांत दिली. पोलिसांनी या कांदाचोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसºया एका घटनेत साकोरे येथील बबन नामदेव लोहाटे यांच्या ५० किलो वजनाच्या ६ गोणी कांदा अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. लोहाटे यांनी दिवसभर कांद्याच्या बराकीतील कांदा गोणीमध्ये भरून तो बराकीच्या बाहेर ठेवला होता. सायंकाळी ६ वाजता ते घरी गेले. सकाळी बबन लोहाटे यांना बंडू तुळशीराम गाडे यांनी बराकीच्या समोर ठेवलेल्या कांद्याच्या पिशव्या कोणीतरी चोरून नेल्याची कल्पना दिली. लोहाटे शेतात गेले असता ७ हजार रुपये किमतीच्या ६ गोण्या कांद्याच्या पिशव्या चोरीला गेल्याचे आढळले. बबन लोहाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलिसांत अज्ञात कांदाचोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या कांद्याचे बाजारभाव कडाडले आहेत. त्यामुळे कांद्याला चांगलाच भाव आला आहे. किरकोळ बाजारातसुद्धा कांदा चांगल्या दराने विकला जातोय. कांद्याला सोन्याचा भाव आल्याने शेतकरी आता कांदापिकाची विशेष काळजी घेत आहे. साकोरे येथील शेतकरी तुळशीराम रामजी गाडे यांनी त्यांच्या शेतातील कांदा बराकीत साठवून ठेवला होता. कांद्याचे भाव अजून वाढल्यावर तो विक्रीसाठी शेतकरी गाडे नेणार होते. या कांद्याचे चांगले पैसे त्यांना मिळणार होते.