उत्तरपत्रिकेच्या फाेटाेकाॅपीसाठी अाता करा थेट पुणे विद्यापीठाकडे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:59 PM2018-05-29T18:59:21+5:302018-05-29T18:59:21+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकेच्या फाेटाेकाॅपी मिळविण्यासाठी अाता विद्यार्थ्यांना महाविद्यालयांएेवजी थेट विद्यापीठाकडे अर्ज करता येणार अाहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फाेटाेकाॅपी मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. परंतु अाता विद्यापीठाच्या विविध परीक्षांनंतर उत्तरपत्रिकेची फाेटाेकाॅपी व पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांएेवजी थेट विद्यापीठाकडे अाॅनलाईन अर्ज करता येणार अाहे. त्यामुळे या दाेन्ही गाेष्टी मिळविण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, दाेन्ही गाेष्टींसाठी एकूण किमान दहा दिवसांचा वेळ वाचणार अाहे.
विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देतात. यानंतर या विद्यार्थ्यांपैकी काही हजार विद्यार्थी फाेटाेकाॅपी व नंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात. या वर्षी हे विद्यार्थी हा अर्ज थेट विद्यापीठाकडे करु शकणार अाहेत. यासाठी अावश्यक असणारे शुल्कही अाॅनलाईन भरता येणार अाहे. याअाधी यासंदर्भातील अर्ज हे महाविद्यालयांकडे करण्यात येत असत. संबंधित महाविद्यालयांकडून पाच दिवसांनी हे अर्ज एकत्रितपणे विद्यापीठाकडे पाठविले जात. अाता महाविद्यालयांकडे अर्ज करण्याचा टप्पा वगळण्यात अाल्याने तसेच, ही प्रक्रिया अाॅनलाईन करण्यात अाल्यामुळे दाेन्ही गाेष्टींसाठीचे प्रत्येकी पाच-पाच दिवस वाचणार अाहेत. याशिवाय महाविद्यालये व विद्यार्थ्यांचे कष्टही यामधून वाचणार अाहेत. या नव्या सुधारणांमुळे उत्तरपत्रिकेची फाेटाेकाॅपी व पुनर्मूल्यांकनाचा निकाल किमान 10 दिवस अाधी मिळणे शक्य हाेणार अाहे. अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अशाेक चव्हाण यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर परीक्षा-उत्तरपत्रिकेची फेरतपासणी व पुनर्मूल्यांकन या लिंकवर गेल्यानंतर यासंबधीची सर्व माहिती व परिपत्रक उपलब्ध अाहे. ही प्रक्रिया मार्च/एप्रिल 2018 परीक्षांच्या निकालापासून लागू करण्यात अाली अाहे.