विद्यार्थ्यांना आता दैनिक पासही...!
By admin | Published: July 28, 2016 04:04 AM2016-07-28T04:04:00+5:302016-07-28T04:04:00+5:30
शालेय विद्यार्थ्यांची प्रवासासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विद्यार्थी ओळखपत्रावर दैनंदिन पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : शालेय विद्यार्थ्यांची प्रवासासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विद्यार्थी ओळखपत्रावर दैनंदिन पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे विद्यार्थ्यांना मासिक आणि साप्ताहिक अशी दोन वेगवेगळी ओळखपत्रेदेखील आता सांभाळावी लागणार नाहीत. पीएमपीने आखलेल्या नव्या धोरणानुसार हे पास देण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
सध्या पीएमपीकडून विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील व हद्दीबाहेरील पासेस पुरविण्यात येतात. त्यांची किंमत ६०० (हद्दीत) आणि ७५० रुपये (हद्दीबाहेर) अशी आहे. अनेकदा विद्यार्थ्यांचा मासिक पास शाळांना सुट्या लागण्याआधीच संपतो. अनेकदा केवळ परीक्षांसाठीच विद्यार्थ्यांना पासची गरजच असते. पण हा कालावधी जास्तीत जास्त दहा दिवसांचा असतो.
आॅगस्टपासून सुरू
अशा वेळी विद्यार्थी पूर्ण महिन्याचा पास काढण्याऐवजी रोज तिकीट काढून जाणे पसंत करतात किंवा साप्ताहिक पास काढतात. मात्र तो पास काढण्यासाठी पुन्हा ओळखपत्र तयार करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मासिक आणि साप्ताहिक असे दोन पास सांभाळावे लागत होते. मात्र आता मासिक पासवरच विद्यार्थ्यांना साप्ताहिक पास देण्यात येणार असल्याची माहिती पास विभागप्रमुख राजेश जाधव यांनी दिली. येत्या १ आॅगस्टपासून ही योजना लागू होणार आहे. दैनंदिन पास ७० रुपये आणि साप्ताहिक पास ३५० रुपयांना असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी यात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.