आता 'AI' सांगणार बिबट्या आला रे आला! सायरन वाजताच लोकांना कळणार, जुन्नरच्या वनविभागाची प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:22 PM2024-10-09T12:22:31+5:302024-10-09T12:23:21+5:30

घरापासून १० मीटरवर बिबट्या आला की त्याची माहिती कॅमेरा ट्रॅपद्वारे ३ सेकंदात क्लाऊडवर येणार, तो मेसेज लगेच सर्व अधिकाऱ्यांना पोहोचेल

Now the AI will say the leopard has come As soon as the siren sounds people will know, the system of the forest department of Junnar | आता 'AI' सांगणार बिबट्या आला रे आला! सायरन वाजताच लोकांना कळणार, जुन्नरच्या वनविभागाची प्रणाली

आता 'AI' सांगणार बिबट्या आला रे आला! सायरन वाजताच लोकांना कळणार, जुन्नरच्या वनविभागाची प्रणाली

श्रीकिशन काळे 

पुणे : वनविभागाच्याजुन्नर विभागातर्फे बिबट्या ओळखण्यासाठी किंवा त्याचे वास्तव्य आहे की नाही ते समजण्यासाठी ‘एआय’ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी जुन्नर विभागाने एआयची प्रणाली तयार केली आहे. बिबट्या समोर आला की, त्या प्रणालीमधून सायरन वाजणार आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना बिबट्या तिथे असल्याचे कळणार आहे.

‘एआय’द्वारे कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याची माहिती समजण्यासाठी ही प्रणाली विकसित केली. ही प्रणाली ५०० मीटरच्या परिसरातील बिबट्या किंवा इतर प्राण्यांचे छायाचित्र त्यात कैद होणार आहेत. केवळ बिबट्या समोर असेल तरच सायरनचा शंभर टक्के आवाज होईल, अन्यथा इतर प्राणी आला तर तो आवाज वाढणार नाही, आपोआप बंद होईल तशी सुविधा त्यामध्ये केली आहे. कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र क्लाऊडवर जाईल आणि तिथे लगेच संबंधित प्राण्याच्या चित्रावर प्रक्रिया होईल. त्यात बिबट्याची खात्री झाली की, सायरन वाजणार आहे. या प्रणालीसाठी सुनील चौरे यांनी मदत केली आहे.

चार तालुक्यांचा समावेश!

जुन्नर वनविभागात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांचा समावेश होतो. हा विभाग सात वन परिक्षेत्रांमध्ये विभागलेला आहे.

प्रकल्पाचा उद्देश

बिबट्यांची ओळख पटविणे आणि त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करणे, स्थानिक रहिवाशांना बिबट्यांच्या उपस्थितीबद्दल त्वरित माहिती देणे, बिबट्यांच्या आणि माणसांच्या संघर्षाचे प्रमाण कमी करणे.

तंत्रज्ञानाचा वापर

१. कॅमेरे आणि सेन्सर्स : जंगल परिसरात उच्च-गुणवत्तेचे कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जातील. हे कॅमेरे बिबटांच्या हालचाली टिपून तो डेटा एआय प्रणालीकडे पाठवतील.
२. एआय अल्गोरिदम : या प्रकल्पात अत्याधुनिक एआय अल्गोरिदमचा वापर करून बिबट्याची ओळख पटवली जाईल. हे अल्गोरिदम बिबट्यांच्या छायाचित्रांचा आणि व्हिडिओंचा विश्लेषण करून त्यांची उपस्थिती निश्चित करतील.

डेटा विश्लेषण आणि सूचना

बिबट्यांच्या हालचालींचा डेटा एआय प्रणालीद्वारे संकलित होईल. बिबट्या दिसला की, त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि रहिवाशांना त्वरित दिली जाईल. यामुळे त्यांना सावधगिरी बाळगता येईल आणि आवश्यक ती पावले उचलता येतील.

जुन्नरमध्ये अनेक घरे शेतामध्ये आहेत. त्या घरापासून १० मीटरवर बिबट्या आला तर त्याची माहिती कॅमेरा ट्रॅपद्वारे तीन सेकंदात क्लाऊडवर येईल. तो मेसेज लगेच सर्व अधिकाऱ्यांना पोहोचेल. त्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यासाठी उपयोग होईल. - स्मिता राजहंस, सहायक वनसंरक्षक, जुन्नर विभाग

‘एआय’च्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालींचा सखोल अभ्यास करता येईल. बिबट्यांच्या सवयी आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल अधिक माहिती मिळवता येईल. जुन्नरमधील एआय बिबट ओळख प्रकल्पामुळे बिबट्यांच्या आणि माणसांच्या सहजीवनात सुधारणा होईल. तसेच, स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होऊन बिबट्यांच्या संरक्षणातही मदत होईल. - अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग

Web Title: Now the AI will say the leopard has come As soon as the siren sounds people will know, the system of the forest department of Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.