"आता देशात बदलाचे वातावरण; कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 09:45 AM2023-03-05T09:45:04+5:302023-03-05T09:45:37+5:30
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचं वक्तव्य.
बारामती : पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही,ते जगजाहीर आहे. कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला... बदल होण्यास अनुकूल वातावरण निर्मिती होत आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.
गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की आता निष्कर्ष काढणे योग्य नाही,एकूण निवडणुकांवरून देशात बदलाचे वारे दिसत आहेत. निवडणुका येतील त्यावेळी लोक सर्व निवडणुकांच्या निकालांचा, निर्णयाचा विचार जरूर करतील.
मी दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असतानाही कांद्याच्या बाजार भावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला, त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. शिंदे आणि फडणवीस सरकार कांदा उत्पादकांबाबत ‘करतो करतो’ म्हणतात, प्रत्यक्षात निर्णय घेत नाही, अशी टीका पवार यांनी केली.
सर्वोच्च न्यायालाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आहेत, मुख्य म्हणजे विरोधी पक्षनेता ही यामध्ये आला, या सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. हा लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय आहे.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी