जेजुरी विश्वस्तपदाच्या आंदोलनात आता मुस्लिम बांधवांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:16 PM2023-06-01T16:16:22+5:302023-06-01T16:16:30+5:30
मुस्लिम बांधवांनी खंडोबा देवाची आरती, भूपाळी आणि जागरण गोंधळही केले
जेजुरी: जेजुरी देव संस्थानच्या विश्वस्त पदी बाहेरील व्यक्तींचा धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियुक्ती करताना स्थानिकांना संधी न दिल्याने जेजुरीकरांनी आंदोलन सूरु केले आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशीही आंदोलन तेवढ्याच तीव्रतेने सुरू आहे. आज येथील मुस्लिम बांधवांनी सुन्नत जमात जामे मस्जिद ट्रस्ट च्या वतीने आंदोलनात सहभाग घेतला. आज सकाळी येथील सुमारे दीडशे ते दोनशे मुस्लिम बांधवांनी मुख्य चौकातून वाजत गाजत मिरवणुक काढून आंदोलनस्थळी येऊन उपोषणाला सुरुवात केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी देवाची आरती, भूपाळी आणि जागरण गोंधळ ही केले.
आंदोलनात माजी नगरसेवक उद्योजक मेहबूबभाई पानसरे, पिंपरीचिंचवडचे माजी उपमहापौर मूहम्मदभाई पानसरे, इब्राहिम काझी, समीर मुलानी, अमीर बागवान, शब्बीर मनेर, सादिक बागवान, माजी नगरसेवक अशपाक पानसरे, सादिक पानसरे, शब्बीर तांबोळी, हनिफ पठाण, कादरभाई शेख रौफ भाई पानसरे, उद्योजक शकील भाई शेख सहभागी झाले होते. समवेत देव संस्थांन चे माजी विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. तीर्थक्षेत्र जेजुरीचा खंडोबा संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. राज्यातील भटक्या विमुक्त जाती जमातींसह सर्वच जमातींचे हे दैवत आहे.
जेजुरी व परिसरातींल मुस्लिम बांधवांना ही खंडोबा देवाचे अनेक मान आहेत. इथला मुस्लिम बांधव खंडोबाचे मानकरी आहेत. येथील पानसरे कुटुंबियांना अश्व आणि देवाच्या पान विडा देण्याचा मान आहे. तर मनेर कुटुंबीय म्हाळसा देवीचा चुडा आणि मुलानी कुटुंबीयांना देवाच्या पालखी सोहळ्यापूढे ताशा वाजवण्याचा मान असल्याचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांनी सांगितले . जोपर्यंत धर्मादाय आयुक्त स्थनिकांना विश्वस्त पदावर संधी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून आम्ही मुस्लिम बांधव ही या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी होणार आहेत असे ही त्यांनी स्पष्ट केले.