पुणेकरांनाे ; वाहतूक नियम माेडल्याचा दंड भरला नसेल तर आता पाेस्टमन येणार घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 03:07 PM2019-07-04T15:07:36+5:302019-07-04T15:09:39+5:30
थकीत दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना पाेस्टाच्या माध्यमातून ई-चलन घरी पाठविण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक शाखेने पाेस्टाची मदत घेतली असून दाेन ते तीन दिवसात ही प्रक्रीया सुरु हाेणार आहे.
पुणे : सीसीटिव्हीच्या माध्यमातून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्यात येताे. याबाबतचा मेसेज वाहन चालकांना त्यांच्या माेबाईलवर पाठवला जात असताे. परंतु अनेक वाहनचालक दंड भरत नाहीत. त्यामुळे आता थकीत दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना पाेस्टाच्या माध्यमातून ई-चलन घरी पाठविण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक शाखेने पाेस्टाची मदत घेतली असून दाेन ते तीन दिवसात ही प्रक्रीया सुरु हाेणार आहे.
शहरातील महत्त्वाच्या चाैकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचे माॅनेटरिंग पाेलीस आयुक्तालयातून करण्यात येते. विविध वाहतूकीचे नियम माेडणाऱ्या वाहनचालकांना आता ई-चलन त्यांच्या माेबाईलवर पाठवले जाते. दंडाची रक्कम वाहनचालकाने पाेलिसांकडे भरणे आवश्यक असते. परंतु अनेक वाहनचालक दंड थकीत ठेवतात. सध्या वाहनचालकांवर काेट्यावधी रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. ही थकबाकी जमा करण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर आहे.
यासाठी वाहतूक शाखेने आता पोस्ट खात्याची मदत घेतली आहे. दंड लावण्यात आलेल्या वाहनाच्या नंबरवरुन त्याची पुर्ण माहिती काढली जाणार असून चलनाची प्रिंट तयार केली जाणार आहे. या प्रिंटवर वाहनचालकाचा पत्ता, मोडलेला नियम, त्याचा फोटो, दंडाची रक्कम आदी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या प्रिंटवर महाराष्ट्र पोलीस शाखेचा लोगो वापरून ही प्रिंट पोस्ट खात्याकडे सुपुर्द केली जाणार आहे. यानंतर पोस्टमन मार्फत ती संबंधीत वाहनचालकांच्या घरी पोहोच केली जाणार आहे. प्रिंट मिळाल्यानंतर वाहनचालकाने जवळच्या वाहतूक शाखेत दहा दिवसाच्या आता दंड भरण्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत दंड न भरल्यास संबंधीत चालकावर मोटार वाहन न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याच्या स्पष्ट सूचना चलन प्रिंटवर देण्यात आल्या असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. ई - चलनबाबत नागरिकांना काही शंका असल्यास त्यांनी जवळच्या वाहतूक शाखेत सकाळी १० ते ५ या वेळेत भेट द्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनाचालकांच्या घरी आता पोस्ट खात्यामार्फत ई - चलनाची प्रिंट पाठवण्यात येईल. प्रिंट मिळाल्यानंतर संबधीताने दंड भरुन सहकार्य करावे. ई - चलन प्रींटवर वाहनचालकाने मोडलेला नियम, फोटो, दंडाची रक्कम आदी माहीती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
- पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा