आता विजेअभावी पाणी बंद नाही
By admin | Published: April 13, 2015 06:15 AM2015-04-13T06:15:20+5:302015-04-13T06:15:48+5:30
शहरास समतोल व पुरेसा वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुढील १५ वर्षांचा आराखडा निश्चित करून महावितरणच्या माध्यमातून १७ ठिकाणी वीज
इंदापूर : शहरास समतोल व पुरेसा वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुढील १५ वर्षांचा आराखडा निश्चित करून महावितरणच्या माध्यमातून १७ ठिकाणी वीज रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यामुळे आता विजेअभावी पाण्याचा खोळंबा होणार नाही. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
इंदापूर शहरास उजनी पाणलोट क्षेत्रातील माळवाडी नं. २ मधून होणारा पाणीपुरवठा भारनियमनाच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी इंदापूर-माळवाडी रस्त्यावर माऊली आईस फॅक्टरी ते माळवाडी नं. २ येथील नगर परिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेपर्यंतच्या एक्स्प्रेस लाईनकरिता सात वीज खांबांना मंजुरी मिळाली आहे. नगर परिषदेच्या या नळपाणी पुरवठा योजनेचा कांदलगाव फीडरवरील वीजपुरवठा बदलून तो एक्स्प्रेस लाईनवर टाकण्यात येणार आहे. या कामामुळे ग्रामीण भागातील वीज भारनियमनाच्या फटका, इंदापूरच्या पाणी पुरवठ्यास बसणार नाही.
८ एप्रिल रोजी माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेस वीजपुरवठा करणारे रोहित्र जळाले होते. तेथे नवीन रोहित्र मिळाले. ते जोडून वीजपुरवठा सुरूही झाला. आणखी एक पर्यायी रोहित्राची मागणी केली होती. ती मंजूर झाली. (वार्ताहर)