महापालिकेच्या माथी आता इतर गावांच्या कचऱ्याचा भार
By admin | Published: February 19, 2016 01:46 AM2016-02-19T01:46:30+5:302016-02-19T01:46:30+5:30
कचरा टाकू देणार नाही, टाकायचाच असेल तर आमच्या गावात विकासकामे करावी लागतील’ अशा अटी, शर्ती टाकून एकीकडे महापालिकेकडून आर्थिक
पुणे: ‘कचरा टाकू देणार नाही, टाकायचाच असेल तर आमच्या गावात विकासकामे करावी लागतील’ अशा अटी, शर्ती टाकून एकीकडे महापालिकेकडून आर्थिक सवलती लाटत असताना दुसरीकडे पालिका हद्दीवरच्या काही गावांमधून मात्र पालिका हद्दीत रोज कित्येक टन कचरा टाकला जात आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
महापालिका हद्दीला लागून गत काही वर्षांत अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच वस्त्याही असतात. ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या या परिसरातील कचऱ्याचे प्रमाण बरेच मोठे आहे. ग्रामपंचायतीकडून कचरा व्यवस्थापनाची काहीच सोय होत नसल्यामुळे या भागातील नागरिक त्यांचा सर्व कचरा महापालिका हद्दीत टाकत असतात. पालिका हद्दीत कचरा टाकणारी हद्दीवरची एकूण ७२ ठिकाणे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने शोधली आहेत. या ठिकाणांमधून रोज साधारण ५० टन कचरा पालिकेला जमा करावा लागत आहे. त्यात ओला, सुका तसेच अन्य प्रकारच्या कचऱ्याचाही समावेश आहे.
धायरीगाव, नऱ्हे, आंबेगाव, हडपसर परिसरातील मांजरी, फुरसुंगी तसेच येवलेवाडी व अन्य गावे, कोंढवा परिसरातील गावे या ठिकाणांहून सर्वाधिक कचरा पालिका हद्दीत येत असतो. वाहने तसेच कर्मचारी स्वतंत्रपणे लावून पालिकेला तो जमा करावा लागतो. त्यासाठी वेगळा खर्च होतो. गावांमधील लोक कचरा पालिका हद्दीत आणून रिकामी जागा दिसेल तिथे टाकतात. पालिकेचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक हटकतात म्हणून रात्रीच्या सुमारास कचरा आणला जातो. असा ठिकठिकाणी जमा झालेला कचरा पालिकेला उचलावाच लागतो. उचलला गेला नाही तर नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात.
हा त्रास कमी व्हावा म्हणून पालिका प्रशासनाने जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार कळवले. ग्रामपंचायतींना त्यांनी सूचना द्याव्यात, त्यांच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सोय त्यांनी लावावी असे त्यात म्हटले आहे. ग्रामपंचायतींनाही पत्रे पाठविण्यात आली. मात्र जिल्हा परिषद प्रशासन किंवा ग्रामपंचायतींनीही त्याची दखलच घेतलेली नाही. पालिकेकडून कचरा नियमित उचलला जात आहे हे लक्षात आल्यानंतर आता कचरा टाकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.