"...आता महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे", बारामतीत शरद पवारांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:32 AM2024-06-19T09:32:43+5:302024-06-19T09:33:07+5:30

वडगांव निंबाळकर (ता. बारामती) येथे जनसंवाद दाैऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते...

"...Now we want to take Maharashtra in our hands no matter what happens", Sharad Pawar blew the assembly trumpet in Baramati. | "...आता महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे", बारामतीत शरद पवारांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

"...आता महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे", बारामतीत शरद पवारांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

बारामती (पुणे) : काही लोक त्यांच्याकडे असणाऱ्या सत्तेचा गैरवापर करतात. सत्तेचा वापर करुन लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल. त्यासाठी येणारी निवडणुक आहे. लोकसभेत तुम्ही चांगले काम केले. आता काही झालं तरी महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे. शेतकरी, मजुर, कामगांरांसह प्रत्येक घटकासाठी सत्तेचा वापर करायचा आहे. तुमचे प्रश्न सोडवून योग्य दिवस येतील अशी काळजी घेतली जाईल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

वडगांव निंबाळकर (ता. बारामती) येथे जनसंवाद दाैऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासह, ऊस दर, साखर वीज, इथेनाॅलच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने साखरधंदा अडचणीत आला. संस्थाचालकांना माझी विनंती आहे, बाबांनो इतके वर्ष तुम्ही आमचे आशीर्वाद घेतले.आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या भल्यासाठी पाठिंबा दिला. मात्र, या सगळ्यांच्या भल्याची तुम्हाला आठवण नसेल तर तुमच्यासाठी काय करायचे याचा निकाल आम्हाला घ्यावा लागेल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर कारखाना पदाधिकाऱ्यांचे नाव न घेता इशारा दिला.

पवार पुढे म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणुक वेगळी होती, ती सोपी नव्हती. देशात आणि परदेशात देखील या निवडणुकीची चर्चा झाली. राज्याची सत्ता दुसऱ्यांच्या हातात आहे, काही लोकांना दमदाटीचे प्रकार घडले. सगळ्या देशात इथ काय होईल, याची शंका होती. आमचे पदाधिकारी गावोगाव जात असत. पहिली निवडणूक यावेळी गावात पुढे कोणी येत नव्हते, सर्वजण शांत होते. न बोलणारी यंदा निवडणूक झाली. त्यामुळे अनेकांना या ठिकाणी काय होईल, याची काळजी होती. मात्र मला खात्री होती नेमके तेच घडले. जे लोक पुढे येत नव्हते, शांत होते. त्यांना कोणते बटण दाबायचे हे सांगावे लागले नाही. मतमोजणी झाल्यावर हे स्पष्ट झाले. त्यामुळे आम्हाला आता लोकांच्या कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल, असे पवार म्हणाले.

आज राज्यात वेगळ्या लाेकांची सत्ता आहे. मोदीसाहेब देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी सबंध देशात वेगळा विचार दाखवायचा प्रयत्न  केला. त्यांच्यासमोर कोणी टिकणार नाही, असे लोकांना वाटले. राज्यात त्यांनी १६ ठिकाणी सभा घेतल्या. माझे भाग्य प्रत्येक ठिकाणी त्यांनी माझे नाव घेत टीका केली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. ज्या बारामतीची शंका होती, त्याठिकाणी ४० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सत्तेचा गैरवाप करणारे असो, वेगळे भाष्य करणारे असो, फोन करुन धमकी दिलेली असो, सगळ्यांनी याची नोंद न घेता योग्य ठिकाणी मतदान करीत मतांचा विक्रम केल्याचे पवार म्हणाले. यावेळी युगेंद्र पवार, सदाशिव सातव, अॅड एस. एन जगताप, सतीश खाेमणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

‘साहेबां’ची आतापासूनच बारामतीत तळ ठोकण्यास सुरुवात-

बारामती विधानसभा निवडणूक शरद पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी आतापासूनच बारामती शहर आणि तालुका पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. पवार यांनी घातलेले लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणारे आहे. मागील आठवड्यापासूनच शरद पवार यांनी बारामतीत विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी डाॅक्टर, व्यापारी, वकील आदी मेळावे घेत दुष्काळी दाैरे केले. त्यापाठोपाठ दुसऱ्याच आठवड्यात तीन दिवसांच्या दाैऱ्यांवर पवार आले आहेत. आज पहिल्याच दिवशी त्यांनी युगेंद्र पवार यांना बरोबर घेत निंबुत, वडगांव निंबाळकर, कोर्हाळे, करंजे पुल, माळेगांव येथे जनसंवाद दाैरे आयोजित करीत संवाद साधला. १९ जुन रोजी पवार यांचे सकाळपासून सायंकाळपर्यंत सांगवी, खांडज, निरावागज, डोर्लेवाडी, काटेवाडी, पिंपळी येथे शेतकरी, ग्रामस्थ यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. तर गुरुवारी (दि. २०) रोजी ते पणदरे, लाटे, लोणीभापकर, मोरगाव येथे शेतकरी संवाद साधणार आहेत.

Web Title: "...Now we want to take Maharashtra in our hands no matter what happens", Sharad Pawar blew the assembly trumpet in Baramati.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.