आता स्वत:च कमी करू शकता कार्बन उत्सर्जन; पुणेरी प्राचीचा इजिप्तमधील परिषेदत सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 04:02 PM2022-11-18T16:02:21+5:302022-11-18T16:03:59+5:30
भारतातून चार जणांची निवड झाली होती त्यात महाराष्ट्रातून एकमेव प्राचीचा समावेश आहे
- श्रीकिशन काळे
पुणे : जगभर हवामान बदलावर चर्चा सुरू असताना पुण्यातील एका तरूणीने मात्र त्यावर प्रत्यक्ष पाऊल उचलून स्वत:चे कार्बन उत्सर्जन कमी केले. यासाठी प्राची शेवगावकर हिने एक 'कूल द ग्लोब ऍप' तयार केले आणि ते वापरून अनेकजण आपली जीवनशैली बदलत आहेत. यामुळे प्राची हिला इजिप्त येथील हवामान बदल सीओपी २७ या परिषदेत बोलण्याची संधी मिळाली. भारतातून चार जणांची निवड झाली होती. त्यात महाराष्ट्रातून एकमेव प्राचीचा समावेश आहे.
दरवर्षी हवामान बदलावर यूनायटेड नेशन्सतर्फे परिषद भरविली जाते. यंदा इजिप्तमधील शरम-ए-शेख येथे ही परिषद होत असून, त्यात पुण्यातील प्राची शेवगावकर (वय २४) या तरूणीने आपण हवामान बदलावर केलेला प्रयोग सादर केला. हवामान बदलावर स्वत: जीवनशैली बदलून पर्यावरण संरक्षण करता येते, हेच तिने आपल्या तयार केलेल्या अँपमधून दाखवून दिले आहे. तिला सीओपी२७ यंग स्कॉलर अवार्ड पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांच्या हस्ते हवामान बदल परिषदेत प्रदान करण्यात आला. प्राचीने बेंगळुरू येथून मीडिया विषयात पदवी घेतलेली आहे. इजिप्तच्या परिषदेसाठी भारतातून ३०० लोकांची यादी तयार केली होती. त्यामधून चौघांची निवड झाली. प्राचीचा त्यात समावेश आहे. प्राचीने कूल द ग्लोब अँप तयार केले. जगभरातील हजारो लोकांनी अँप डाऊनलोड करून जीवनशैली बदलली आहे.११० देशांमधील लोक त्याचा वापर करत आहेत.
काय आहे ऍप-
मी स्वत: प्रदूषण कमी कसे करू शकते, यावर विचार करून प्राचीने कूल द ग्लोब हे अँप बनवले. त्यात रोज कोणत्या गोष्टी न केल्यास किती कार्बन उत्सर्जन कमी होईल ते सांगितले आहे. जसे घरापासून जवळ काही वस्तू आणायला जायची असेल तर चालत जावे किंवा सायकलीचा वापर करावा. बाहेर जाताना चारचाकीपेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. पार्सल न मागवता जवळच्या दुकानांतून खरेदी करणे, मांसाहार न करणे, झाडं लावणे अशा गोष्टींचा समावेश अँपमध्ये आहे.
ऍपमुळे आतापर्यंत लाखो किलो कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. एक लाख झाडं लावण्याच्या बरोबरीचे हे काम आहे. केवळ चर्चा न करता ठोस पाऊल उचलले तर जगभरातील हवामान बदलाचा होणारा परिणाम कमी करता येऊ शकतो.
- प्राची शेवगावकर