पदवी प्रमाणपत्र मिळणार आता महाविद्यालयातच

By Admin | Published: April 23, 2015 06:38 AM2015-04-23T06:38:18+5:302015-04-23T06:38:18+5:30

पदवी प्रमाणपत्र वितरणावेळी विद्यापीठ आवारात होणारा गोंधळ तसेच विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमांची पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालय

Now, you will get a degree certificate | पदवी प्रमाणपत्र मिळणार आता महाविद्यालयातच

पदवी प्रमाणपत्र मिळणार आता महाविद्यालयातच

googlenewsNext

पुणे : पदवी प्रमाणपत्र वितरणावेळी विद्यापीठ आवारात होणारा गोंधळ तसेच विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमांची पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालय स्तरावरच देण्याचा निर्णय बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, पदव्युतर पदवी अभ्यासक्रमांची पदवी प्रमाणपत्रे व सुवर्णपदकांचे वितरण दर वर्षीप्रमाणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभातच होणार आहे.
विद्यापीठातर्फे दर वर्षी पदवी प्रदान समारंभाचे विद्यापीठ आवारात आयोजन केले जाते. पदवी अभ्यासक्रमांसह पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या पदवी प्रमाणपत्रांचे वितरण या दिवशी विद्यार्थ्यांना केले जाते. या दिवशी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी हजारो विद्यार्थी नोंदणी करतात. या वर्षी सुमारे ८८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ३० हजार विद्यार्थी प्रमाणपत्र नेण्यासाठी आले होते. मात्र, यामुळे विद्यापीठ आवारात मोठी गर्दी झाली होती. पदवी वितरणासाठी नियोजन करूनही वाटपात मोठा गोंधळ उडाला होता. अनेक विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. रात्री उशिरापर्यंत प्रमाणपत्रांचे वाटप सुरू ठेवावे लागले. मागील वर्षीही पदवी प्रदान समारंभात अशाच प्रकारे गोंधळ उडाला होता.
ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. केवळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रमाणपत्रे व सुवर्णपदके यांचे वितरण मुख्य पदवी प्रदान कार्यक्रमात केले जाणार आहे.
दरम्यान, पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम अनुक्रमे ६ व २ वर्षांत पूर्ण न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे कधीही पदवी पूर्ण करता यावी, यासाठी परीक्षा मंडळाचे सदस्य सुधाकर जाधवर यांनी मंडळासमोर प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now, you will get a degree certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.