Weather Forecast | आता मिळणार सहा किलोमीटर परिसराचा हवामान अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:45 PM2022-11-18T12:45:19+5:302022-11-18T12:46:53+5:30
अतिवृष्टी, चक्रीवादळे आदी आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविला जाणार...
पुणे : देशात दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहेत. त्याचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी आता पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये अत्याधुनिक सहा किलोमीटर इतक्या कमी अंतराची जागतिक हवामान अंदाज प्रणालीचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे अगदी छोट्या परिसरातील हवामान बदल टिपता येणार असून अतिवृष्टी, चक्रीवादळे आदी आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविला जाणार आहे. पुढील मॉन्सूनपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित होईल, असा विश्वास केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन यांनी व्यक्त केला.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) हीरकमहोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रमात या प्रणालीचे अनावरण केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, वरिष्ठ शास्रज्ञ प्रा. आर. एन. केशवमूर्ती, प्रा. जगदीश शुक्ला, आयआयटीएमचे संचालक डॉ. आर. कृष्णन, सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जगभरात हवामानाच्या अंदाजासाठी १२ किलोमीटरचे मूलभूत एकक (रिझॉल्यूशन) आहे. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी प्रथमच सहा किलोमीटरची हाय रिझॉल्यूशन जागतिक हवामान अंदाज प्रणाली (एचजीएफएम) विकसित केली आहे. प्रणालीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या चालू असून, लवकरच ती प्रत्यक्ष वापरात येईल, असा विश्वास डॉ. रविचंद्रन यांनी या वेळी व्यक्त केला. ‘हवामान अंदाज वर्तविण्याच्या क्षेत्रात भारताला अजूनही सुधारणा करण्याची गरज असून देशातील हवामान अंदाज जरी चांगले येत असले, तरी अजूनही सुधारण्यास खूप वाव आहे. ढगांच्या भौतिक आणि रसायनशास्राबरोबरच, हवामानातील अंतर्गत बदल आण ध्रुवीय बदलांचाही मॉन्सूनवर होणारा परिणाम अभ्यासावा लागणार आहे. त्यामुळे आपण अधिक अचूक अंदाज वर्तवू शकतो.’’
यावेळी पावसाळ्यातील विजांच्या दुर्घटनेची माहिती देणाऱ्या दामिनी ॲपच्या प्रादेशिक भाषांमधील अत्याधुनिक मॉडेलचेही अनावरण करण्यात आले. दामिनी ॲपचे नवे व्हर्जन हे १४ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. या ॲपमुळे विजांच्या कडकडाटांचे अलर्ट मिळाल्याने खबरदारीचे उपाय घेणे शक्य होणार आहे. तसेच या ॲपवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस मिळणार आहेत. तसेच पुश मेसेज या नव्या सुविधेमुळे २० किलोमीटर परिसरातील अलर्ट मिळतील.
मॉन्सूनमध्ये या नवीन प्रणालीची चाचणी घेण्यात आली. निष्कर्षांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येईल. पाच दिवसांचा अंदाज वर्तविण्यासाठी ही प्रणाली निश्चितच उपयोगी ठरेल.
- डॉ. एम. रविचंद्रन, सचिव, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय