RTO | आरटीओ कार्यालयातील हेलपाटे वाचणार; घरबसल्या परवान्याचे नुतनीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:40 AM2022-06-15T10:40:36+5:302022-06-15T10:42:01+5:30
तुमचे लायसन घरबसल्या नुतनीकरण करून मिळणार...
पुणे : तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन नूतनीकरण करण्यासाठी, लायसनवरचा पत्ता बदलून घेण्यासाठी किंवा अन्य अनेक कामांसाठी वारंवार आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागले आहेत का? तर आता इथून पुढे तुमचे हे हेलपाटे वाचणार आहेत. कारण आरटीओ कार्यालयाने आता तब्बल ८०पेक्षा अधिक सेवा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे तुमचे लायसन घरबसल्या नुतनीकरण करून मिळणार आहे.
ऑनलाईन झालेल्या काही प्रमुख सेवा
इतर सेवांमध्ये नोंदणीचे डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज, नोंदणी प्रमाणपत्रासाठी एनओसी मंजूर करण्यासाठी अर्ज, मोटार वाहनाची मालकी हस्तांतरित करण्याची नोटीस, मोटार वाहनाच्या -मालकीच्या हस्तांतरणासाठीचा अर्ज, पत्ता बदलण्याच्या नोटिसीतील नोंदणी प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त वाहन चालक प्रशिक्षण केंद्रावरून चालक प्रशिक्षण घेण्यासाठी नोंदणी करणे, अधिकाऱ्याच्या मोटार वाहनाची नोंदणी करण्यासाठी अर्ज, अधिकाऱ्याच्या मोटार वाहनाचे नवीन नोंदणी चिन्ह, असाइनमेंटसाठी अर्ज, भाड्याने खरेदी करार किंवा भाड्याने खरेदी समाप्ती करार आदी.
असा करा ऑनलाईन अर्ज-
https://parivahan.gov.in/parivahan/ या वेबसाईटवर जा. त्यावर ड्रायव्हर्स / लर्नन्स लायसन्स आणि त्याचा लोगो असलेली लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तेथे परदेशी नागरिक, सामान्य नागरिक, निवृत्त झालेले नागरिक आणि जनरल असे अनेक विकल्प येतील. त्यातील तुम्हाला असलेले विकल्प निवडा आणि लायसन पहिल्यांदा काढत आहात की पूर्वी काढले आहे आदी विकल्पांवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक पर्याय निवडा. मोबाईल नंबर निवडल्यास त्यावर एसएमएस व्दारे ओटीपी येईल तो वेबसाईटवर टाकल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म येईल तो भरून त्याला तुमचे जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पत्ता असलेला पुरावा जोडून फॉर्म भरा.
नागरिकांच्या सेवेसाठी आरटीओ कार्यालयातील अनेक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी नागरिकांनी आरटीओच्या अधिकृत परिवहन या वेबसाईटवर जाणे महत्त्वाचे आहे. अन्यथा गुगलवर लायसन असा शब्द जरी सर्च केला तरी लायसन काढून देण्यासाठी अनेक एजंटांच्या वेबसाईट ओपन होतात आणि त्यांच्याकडून एक तर फसवणूक होते किंवा ऑनलाईन प्रक्रिया करून देण्यासाठी त्यांचे जादा दर लावून लायसनसाठी हजार - बाराशे रुपये उकळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत साईटवर जाऊनच लायसनसाठी अर्ज करावा.
- संजय ससाणे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे