आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशन
By Admin | Published: January 22, 2016 01:42 AM2016-01-22T01:42:57+5:302016-01-22T01:42:57+5:30
आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशनच रुजली आहे. पुरस्कार परत करणारे स्वत:ला विचारवंत म्हणवून घेतात. मात्र, खऱ्या विचारवंतांचे कार्य
पुणे : आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशनच रुजली आहे. पुरस्कार परत करणारे स्वत:ला विचारवंत म्हणवून घेतात. मात्र, खऱ्या विचारवंतांचे कार्य हीच त्यांची ओळख असते. त्यांना कोणत्याही पुरस्काराच्या पोचपावतीची गरज नसते. म्हणूनच, त्यांच्या हातून लिखाण घडते. माणसाच्या जीवनात विचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तके विचार करायला शिकवतात, असे प्रतिपादन डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते माधव मेहेंदळे लिखित ‘समर्पण’ या सेवाकार्यातील अनुभवांवर आधारित पुस्तक आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या उत्तुंग कार्यकर्तुत्वाचा मागोवा घेतलेले डॉ. शरद कुंटे लिखित ‘कर्मयोगी ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी देगलूरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
देगलूरकर म्हणाले, ‘पुस्तकांच्या रूपाने संस्कृतीचा सर्व आयामांचा विचार होतो. वैज्ञानिक आणि सांस्कृतिक विचार हे कधीही न संपणारे असतात.’ डॉ. शरद कुंटे यांनी अब्दुल कलाम यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडत पुस्तकामागील विचार मांडले. माधव मेहेंदळे यांनी सेवाकार्यात आलेल्या अनुभवांचे कथन केले. (प्रतिनिधी)